पुणे - आमची एका विवाह नोंदणी (मॅट्रिमोनियल) संकेतस्थळावर ओळख झाली होती. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. आमच्यात जवळीक वाढल्याचा गैरफायदा घेत त्याने माझ्यावर अत्याचार केला. त्याने सांगितले होते की, माझा आयात-निर्यातीचा व्यवसाय असून, त्यात खूप नुकसान झाले आहे. व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी त्याने मला २० लाख रुपयांचे कर्ज काढण्यास भाग पाडले.
एवढेच नव्हे, तर मी त्याला रोख आणि ऑनलाइन स्वरूपात सात असे एकूण २७ लाख रुपये दिले. आपण लग्न करू, असे आमिष त्याने दाखवले. मात्र, त्याने लग्न न करता माझी आर्थिक फसवणूक केली. ही व्यथा आहे, कोंढवा परिसरात राहात असलेल्या एका तरुणीची.
‘मॅट्रिमोनियल’ संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एका तरुणाने तिची फसवणूक केली. याबाबत तिने अमित चव्हाण नावाच्या मुलाविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कोंढवा येथील तरुणीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार एक उदाहरण आहे. ‘मेट्रोमोनियल’ संकेतस्थळाद्वारे विविध प्रकारे फसवणूक होत असल्याचे दिसते.
यातील बहुतांश प्रकारात बलात्कार आणि आर्थिक फसवणूक होत आहे. मुलीचे वय, तिची आर्थिक व सामाजिक स्थिती अशा अनेक बाबींचा विचार करून हे भामटे त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात, त्यानंतर त्यांना बुडवतात. त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करतात. वाद झाल्यानंतर त्यांना त्याच व्हिडिओ आणि फोटोंच्या आधारे फसवणूक करतात. काही तरुणांच्या बाबतीतदेखील असेच प्रकार घडले आहेत.
फसविण्यासाठी वापरली जाणारी प्रमुख कारणे
1) घरातील व्यक्ती आजारी आहे
फसवणुकीच्या प्रकारांमध्ये हे एक कारण बहुतांश प्रमाणात सांगितल्याचे समोर आले आहे. ‘माझ्या घरातील व्यक्ती आजारी आहे, त्यामुळे मला सध्या पैशाची गरज आहे. आपले लग्न झाल्यावर मी घेतलेले पैसे परत करेन,’ असे सांगितले जाते.
2) महागडी कार घ्यायची आहे
‘मला महागडी कार घ्यायची आहे. त्यासाठी काही पैसे हवे आहेत,’ असेही सांगितले जाते.
3) व्यवसायात तोटा
फसवणुकीच्या प्रकारांमध्ये सर्वाधिक तरुण आपल्याला व्यवसायात तोटा झाल्याचे सांगत आहेत. तू मला आता आर्थिक मदत केली, तर माझा व्यवसाय पुन्हा चांगल्या स्थितीत येर्इल. व्यवसाय परत चांगला सुरू झाला की, आपण लग्न करू. तोपर्यंत मी तुला टप्प्याटप्प्याने पैसे देईन किंवा कर्ज असेल, तर हप्ते भरतो, असे सांगितले जाते.
लग्नाच्या पहिल्याच रात्री भंगले स्वप्न
येथील एका २९ वर्षीय ‘आयटी’ अभियंता तरुणीची ‘मॅट्रिमोनियल’ संकेतस्थळावर ३२ वर्षीय मुलासोबत ओळख झाली. त्याने स्वतःचा ऑनलाइन पद्धतीने वस्तू विक्रीचा व्यवसाय आणि कुर्ला याठिकाणी स्वतःचे घर असल्याचे तरुणीला सांगितले. काही दिवसांनी दोघेही विवाहबंधनात अडकले.
लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या स्वप्नांना सुरुंग लागला. ‘मी खूप आर्थिक अडचणीत आहे. मला पाच लाख रुपये दे, नाहीतर तुझ्या शरीराला हातही लावणार नाही,’ अशी अजब अट त्याने घातली. त्यानंतर अनेक कारणे सांगून त्याने तरुणीकडून सुमारे १७ लाख रुपये उकळले आणि तो पसार झाला.
अशी घ्या काळजी
प्रोफाइल चांगले तपासून घ्यावे
त्वरित वधू किंवा वर यांच्यावर भरवसा ठेवू नका
शक्यतो आर्थिक व्यवहार टाळा
दोघांच्याही कुटुंबाशी चांगली ओळख करून घ्या
जोडीदार सांगत असलेला व्यवसाय अस्तित्वात आहे का, याची खात्री करावी
फसवणूक होत असल्याची शंका आल्यास त्वरित पोलिसांना कळवावे
कुटुंबातील व्यक्तींना सहभागी करून घ्या
‘संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर समोरील व्यक्तीची सर्व माहिती घेणे आवश्यक आहे. केवळ दोघांच्या संवादातून किंवा काही भेटींमधून अंतिम निर्णय घेतल्यास फसवणूक होण्याची शक्यता असते. अनेकदा कुटुंबातील व्यक्तींना सहभागी करून घेतले जात नाही. त्यामुळे संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर वधू किंवा वर यांच्या कुटुंबातील व्यक्तींना यात सहभागी करून घ्यावे,’ असे आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले.