Harshwardhan Sapkal : रडायचे नाही, लढायचे दिवस! रस्त्यावर उतरून लढावे लागणार
esakal February 19, 2025 07:45 AM

मुंबई - ‘लढाईतील आयुधे बदलली आहेत. आता आपल्याला रस्त्यावर उतरून लढावे लागणार आहे. आता रडायचे नाही, लढायचे दिवस आहेत,’ असे म्हणत काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पदाची सूत्रे स्वीकारली. राज्यात पक्ष संघटना मजबूत करून पुढील निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, अशी दिशाही सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना दिली.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी निवड झालेले हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. त्यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. सपकाळ यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

काम करणारा कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असून यापुढील काळात कार्यकर्ता प्रशिक्षणावर भर दिला जाणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केले. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘आपल्याकडे नेतृत्व आहे आणि खाली कार्यकर्ता आहे. मधल्या सुटलेल्या कड्या पुढील काळात जोडायच्या आहेत. आता कोणताही बोगसपणा चालू दिला जाणार नाही. कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. लढाईतील आयुधे बदलली आहेत.

रस्त्यावर उतरून लढावे लागेल. सच्च्या कार्यकर्त्यांना पुरेशी ताकद मात्र दिली जाईल. आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत.’ आपल्याला संघटना बांधून विचारांची लढाई लढायची असल्याचे सांगत सपकाळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ए कातिल में है …’ अशा ओळी म्हणत विरोधकांनाही आव्हान दिले.

तसेच, पुढील पाच वर्षांत मला विधानपरिषदेत आमदार किंवा राज्यसभेवर खासदार म्हणून जायचे नाही तर, राज्यात पक्ष संघटना मजबूत करून पुढच्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, असा निर्धार सपकाळ यांनी व्यक्त केला.

सपकाळ म्हणाले,

- काँग्रेसची विचारधारा प्रत्येक घरात आणि मनात रुजविणार

- संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार

- दिखाऊ आंदोलनांना थारा दिला जाणार नाही

- भाजप सक्षम नाही म्हणूनच त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले

हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपाने एका नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. सपकाळ हे कार्यकर्त्यांसाठी सदैव उपलब्ध असतात. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या त्याला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. सर्वोदयी तत्वज्ञान, गांधी विचाराने ते काम करतात. सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील गावागावांत शिबिरे घेऊन विचाराचे वादळ उठवू.

- बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते

मागील चार वर्षांत संघटनेला बळ देण्याचे काम केले. विधानसभेला काँग्रेसला ८०-८५ जागी विजय मिळेल असे चित्र होते, पण भाजपने मतांची चोरी करून सत्ता आणली. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली, आता आपल्याला पुढची लढाई लढाईची आहे.

- नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष

वडेट्टीवारांची कोंडी

लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला पण विधानसभेत मात्र काँग्रेसला अपयश आले. आता पुन्हा जोमाने काम करावे लागणार आहे, असे मत विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. वडेट्टीवार यांनी यावेळी, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते गाफिल राहिल्याची टीका केली. मात्र, कार्यकर्त्यांनी उभे राहून ‘नेत्यांच्या चुका कार्यकर्त्यांवर कशाला ढकलता,’ असा जाब विचारत वडेट्टीवारांची कोंडी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.