Water Energy Project : जल, ऊर्जा प्रकल्पांना दोन हजार ८६९ कोटींची मंजुरी; विजेची मोठी गरज भागणार
esakal February 19, 2025 07:45 AM

मुंबई - कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे आणि योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपये तर जळगाव जिल्ह्यामधील वरखेडे लोंढे (बॅरेज) (ता. चाळीसगाव) या मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख अशा दोन हजार ८६९ कोटी रुपयांच्या सुधारित तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या प्रकल्पामुळे योजनेसाठी लागणाऱ्या दरवर्षी सुमारे ३९८ दशलक्ष युनिट विजेची गरज भागवली जाणार आहे. कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ अशा दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. सिंचन योजनेचा उद्भव कृष्णा नदीवर म्हैसाळ येथे आहे.

येथून विविध टप्प्यांमध्ये २३.४४ अब्ज घनफूट पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठे महांकाळ, तासगाव, जत व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील अवर्षण प्रवण भागातील एक लाख आठ हजार १९७ हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाच्या मंजुरीवेळीच प्रकल्पांतर्गत पाणी उपसा करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जा स्रोतांमध्ये सौर ऊर्जा वापराचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा व आनुषंगिक अटी घातल्या होत्या. यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी लागणाऱ्या विजेच्या वापरापोटी होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे.

या ऊर्जा कार्यक्षम जलव्यवस्थापन व सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी भांडवल निधीसाह्याच्या प्राथमिक प्रकल्प अहवालास केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयानेही मान्यता दिली आहे. या करिता केएफडब्ल्यू जर्मन बँकेकडून १३० मिलियन युरो (अंदाजे १ हजार १२० कोटी) कर्ज स्वरूपात व ४७४ कोटी राज्य शासनाची गुंतवणूक अशा एकूण एक हजार ५९४ कोटी किमतीच्या प्रकल्पासाठी त्रिपक्षीय करार करण्यास मान्यता दिली आहे.

वरखेडे लोंढे बॅरेजसाठी १२७५ कोटी

जळगाव जिल्ह्यामधील वरखेडे लोंढे (बॅरेज) (ता. चाळीसगाव) या मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या सुधारित तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत गिरणा नदीवर मौजे वरखेडे बु. येथून दीड किलोमीटरवर आहे. या बॅरेज प्रकल्पामुळे चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील आठ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जमीन

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाउंडेशन रुग्णालय, मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे.

याशिवाय ट्रस्टने कर्वेनगर येथे जमीन खरेदी केली आहे. या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान हा नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यासाठी ७९५ चौरस मीटर जमिनीची आवश्यकता असल्याची मागणी ट्रस्टने केली होती. त्यानुसार ही जमीन वार्षिक एक रुपया या नाममात्र दराने भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी देण्यात आली. नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा खर्च हा संबंधित ट्रस्ट करणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.