Congress State President : काँग्रेसने साधला कुणबी-मराठा समतोल; दिग्गजांच्या नकारानंतर सपकाळांकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे
esakal February 14, 2025 05:45 AM

मुंबई - दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने राहुल गांधींसमवेत ‘जनता के सिपाही’ या मोहिमेपासून असलेल्या विदर्भातील हर्षवर्धन सपकाळ यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन हे राहुल गांधी यांच्या निकटच्या वर्तुळातील आहेत.

सतेज पाटील, विश्वजीत कदम आणि अमित देशमुख या काँग्रेसच्या तीन मराठा नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नितीन राऊत यांचे नाव या पदासाठी पुढे केले जात होते. राऊत हे दलित समाजातील उच्च शिक्षित असल्याने हा समाज आपल्या बरोबर येईल, असे काँग्रेसचे गणित होते.

मात्र एका अल्पसंख्यांकाच्या शिरावर ही जबाबदारी दिल्यास मराठा समुदाय आणि ओबीसी समुदाय काँग्रेसकडे वळणार नाही, अशी भीतीदेखील व्यक्त केली जात होती. राऊत यांनी मी अल्पसंख्याक आहे, या निकषावर प्रदेशाध्यक्ष करू नये अशी भावना नेत्यांजवळ व्यक्त केल्यानंतर पुन्हा एकदा नव्या नावाचा शोध सुरू झाला आणि तो राहुल गांधी यांच्या वर्तुळातील मीनाक्षी नटराजन यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावावर थांबला.

स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राजकारणाची वाटचाल करणाऱ्या राहुल गांधी यांना हर्षवर्धन सपकाळ यांच्याबद्दल आपुलकी आहे. ते त्यांचा जवळचे नेते मानले जातात. गेल्या काही वर्षांपासून ‘बॅकरूम बॉय’ म्हणून राजकारणात समोर आलेल्या तरुणांपैकी ते एक आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील सपकाळ यांना आमदारकीच्या निवडणुकीतही एकदा यश मिळाले होते. सध्या ते महत्त्वाच्या राज्यांचे युवक प्रभारी म्हणून काम करीत होते. मराठा समाजातील विविध घराण्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत.

विश्वजीत कदम यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येईल, असे मानले जात होते. मात्र ओबीसी समाजही सोबत असावा, या भावनेने विजय वडेट्टीवार पुन्हा एकदा काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवडले गेले आहेत.

पक्षाध्यक्षांची निवड निकषानुसारच!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळाले असले तरी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्ष प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लगेचच कोणताही क्रांतिकारी राजकीय बदल करायची गरज नाही तर भाजपच्या ध्येय-धोरणांना विरोध करणारा तरुण वर्ग काँग्रेस पक्षात सक्रिय करण्यावर यंदा पक्षश्रेष्ठींनी भर दिला आहे. या निकषावरच हर्षवर्धन सपकाळ यांची आज काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असल्याचे मानले जाते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.