नवी दिल्ली - महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारयाद्यांसह विविध गैरप्रकार झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली. भाजपला रोखण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी रोडमॅप तयार करण्याची गरज आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी बुधवारी रात्री उशिरा राहुल गांधी यांची, तर अरविंद केजरीवाल यांची आज दुपारी त्यांच्या फिरोजशहा रस्त्यावरील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, प्रियांका चतुर्वेदी, संजय पाटील होते. निवडणुकांपूर्वी मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होत असल्याबाबत त्यांनी या भेटीत चर्चा केली.
यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतील निवडणूक जिंकणाऱ्या पक्षांच्या विजयात निवडणूक आयोगाचा मोठा हात आहे. विविध राज्यांतील सत्ताधारी वा विरोधी पक्षांतील नेत्यांना निवडणूक आयोगाची प्रक्रिया आणि यंत्रणा निःपक्ष वाटत नाही.
त्यासाठी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना भेटणे गरजेचे होते. या निवडणुकांमध्ये मतदारयाद्या आणि ईव्हीएममध्ये झालेले गैरप्रकार जनतेसमोर आणणे गरजेचे असून त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.’
पक्षांची फसवणूक
‘आमच्या देशाचे भविष्य धूसर होत आहे. आज देशात प्रत्येक निवडणुकीत मतदारयाद्यांचे आणि ईव्हीएमचे गैरप्रकार सुरू आहेत. आमच्या देशात लोकशाही असल्याचा आम्ही समज करून घेत असलो तरी कदाचित आमची लोकशाही राहिलेली नाही. हा समज दूर करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाला पुढे यावे लागेल.
आज जी आमची, काँग्रेसची आणि ‘आप’ची फसवणूक झाली ती देशभरातील सर्वच पक्षांची होईल. देशातील लोकशाहीबरोबरच प्रत्येक प्रादेशिक पक्षाला संपविण्याचे भाजपचे स्वप्न आहे. इंडिया आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी याविषयी रोडमॅप तयार करावा. आपल्या दिल्ली भेटीचे तात्पर्य एवढेच आहे,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आयोगाकडून स्पष्टीकरण अपेक्षित
‘ईव्हीएम’मधील मतदाराचे मत नेमके कुठे जाते याविषयी निवडणूक आयोगाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. ‘महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ४७ लाख मतदार वाढले. मतदानाच्या शेवटच्या तासात वाढलेल्या ७६ लाख मतांविषयी आयोगाने कुठेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
शेवटच्या तासातील मतदानाचे व्हिडिओ फुटेज तसेच मतदारांना टोकन दिले असतील तर ते आयोगाने दाखवावे. निवडणूक आयोग विरोधी पक्षांच्या उमेदवारांना प्रतिसाद देत नाही. महाराष्ट्रातील निवडणूक स्वतःच्या ताकदीवर जिंकलेलो नाही हे भाजपलाही माहिती आहे. त्यामुळेच त्यांच्या मनात असुरक्षितता आहे,’ असा दावाही आदित्य यांनी केला.
खासदारांसोबत भोजन
उद्धव ठाकरे यांच्याकडील नऊपैकी सात लोकसभा खासदार शिवसेना तसेच भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी संजय राऊत यांच्या बंगल्यावर भोजनादरम्यान आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांसोबत संवाद साधला. या खासदारांनी त्यांची मते आणि भूमिका मांडल्या. आपली वज्रमूठ आणि एकजूट कायम ठेवा, असे आवाहन आदित्य यांनी त्यांना केले.
शिंदेंच्या सत्कारावर आक्षेप
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून झाल्याबद्दल उद्धव ठाकरेंच्या पक्षाने घेतलेल्या आक्षेपाचे आदित्य यांनी समर्थन केले. ‘‘एकनाथ शिंदे यांनी केवळ आमच्याशीच नव्हे तर महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे. महाराष्ट्रात येणारे उद्योग दुसऱ्या राज्यात पाठविण्याचे पाप केले.
सरकारची आणि पक्षाची चोरी करणाऱ्यांचे, पक्ष आणि कुटुंबांचे विभाजन करणाऱ्यांचे कौतुक आमच्याकडून कधीही होणार नाही,’ असे ते म्हणाले. आदित्य यांनी दिल्लीतच असलेल्या शरद पवार यांची भेट घेणेही टाळले. ‘मुंबईत आमच्या भेटी होत असतात’, असे उत्तर त्यांनी दिले. तसेच, ठाकरे गटाचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित होते. त्यावरही, आदित्य यांनी उत्तर देण्याचे टाळले.
जनतेचे प्रश्न कधी सोडविणार?
राज्यातील महायुती सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आमचा पक्ष जेवढा फोडायचा असेल तो फोडा. पण या तिन्ही पक्षांनी जाहीरनाम्यांमध्ये मांडलेले विषय आणि जनतेचे प्रश्न यावर कधी काम सुरु करणार हे सांगावे. गेल्या तीन महिन्यांत प्रथम मुख्यमंत्री कोण होणार, मग मंत्री कोण होणार, मग जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण होणार, गाडी कोणाची, बंगला कोणाचा, जिल्हा कोणाचा हा वाद अजूनही संपलेला नाही.’