सांगली – महायुती सरकार राज्यात पुन्हा एकदा डान्सबार सुरु करण्यास परवानगी देणार असल्याची माहिती आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संबंधीची चर्चा झाली असून राज्यात पुन्हा छमछम सुरु होणार अशी चर्चा आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वात तरुण आमदार रोहित पाटील संतप्त झाले आहेत. सरकार राज्यात डान्सबार सुरु करण्याचा घाट घालत असेल तर महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरू असा थेट इशारा आमदार रोहित पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 2005 मध्ये राज्यात डान्सबारला बंदी घातली होती. आर. आर, पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आता आमदार आहेत. राज्य सरकारकडून डान्स बार सुरु करण्यास परवानगी दिली गेली तर आम्ही मैदानात उतरू, असा इशारा आर. आर. पाटलांच्या आमदार चिरंजीवांनी सरकारला दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डान्सबार नव्या नियमांवलीनुसार सुरु करण्यासंबंधी चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. डान्सबारसंबंधी नवीन कायद्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. लवकरच हा कायदा विधानसभेत मांडला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकार जुन्या कायद्यात सुधारणा करून नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने 2005 मध्ये राज्यातील डान्सबारवर बंदी घातली होती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदीची घोषणा केली होती. आर. आर. पाटील यांच्या या निर्णयाचे राज्यात जोरदार स्वागत झाले होते. मात्र, डान्सबार मालकांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2019 मध्ये ही बंदी उठवली होती. काही नियम लागू करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आता राज्य सरकार नियमात बदल करून डान्सबार सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे. याला आमदार रोहित पाटील कडवा विरोध करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Ajit Pawar : एका व्यक्तीमुळे अनेकजण सोडून गेले, मी वरिष्ठांना सांगितलं मात्र…; अजितदादांचा रोख कोणाकडे?