अर्धनग्न अवस्थेतील चोरट्यांनी लुटला बार
अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर) : येथील साई सागर हॉटेलमध्ये बुधवारी (ता. ५) चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन सराईत चोरट्यांनी अर्धनग्न अवस्थेत हॉटेलचे पत्रे तोडून प्रवेश करीत एकूण ७० हजारांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या लादी नाका, बुवापाडा परिसरात राजस महेश पिसाळ यांचा साई सागर नावाचा बार आहे. या बारमध्ये बुधवारी (ता. ५) मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली. राजस पिसाळ हे नेहमीप्रमाणे रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बार बंद करून घरी गेले होते. या वेळी दोन चोरट्यांनी या बारचे पत्रे तोडून आतमध्ये प्रवेश केला. यामध्ये दोन चोरट्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडून काउंटरच्या लॉकरमध्ये ठेवलेली सुमारे ७० हजारांची रोकड लंपास केली आहे. दरम्यान, हे चोरटे बारमध्ये प्रवेश करताना आणि सीसीटीव्हीचा वायर कापताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यानंतर राजस पिसाळ यांनी गुरुवारी (ता. ६) अंबरनाथ पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
नोट : सोबत फोटो जोडलेला आहे.