पाणी समस्येमुळे उरणकर त्रस्त
esakal February 13, 2025 11:45 PM

पाणी समस्येमुळे उरणकर त्रस्त
बालई परिसरात कमी दाबाने पुरवठा
उरण, ता. १३ (वार्ताहर) : उरण नगरपालिका हद्दीतील नागरिकांना विविध नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे बालई परिसरातील नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरात मागील २० ते २५ दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
उरण नगरपालिका हद्दीतील बालई परिसरातील नागरिकांना पालवी हॉस्पिटल येथील पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र येथील पाइपलाइनवरूनच परिसरातील मोठमोठ्या इमारतींना नळ लाइन जोडल्याने बालई परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मागील २० ते २५ दिवसापासून पाणीटंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक भांड्यात पाण्याची साठवणूक करून ठेवावी लागत आहे. विशेष म्हणजे परिसरात बोरिंगची व्यवस्था नसल्याने पाण्याअभावी नागरिकांचा घसा कोरडा पडला आहे. नगरपालिकेचे कर्मचारी वेळेवर कर वसुली करण्यासाठी तगादा लावतात, मात्र नागरिकांना असणाऱ्या समस्या सोडविण्यामध्ये अधिकारीवर्ग अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पालवे हॉस्पिटलजवळील चेंबर अनेक दिवसांपासून खोदकाम करून ठेवलेले आहे. मात्र त्याच्या दुरुस्तीचे काम अद्याप नगरपालिका करू शकलेली नाही. नगरपालिकेने या परिसरातील पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील महिलावर्गानी दिला आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी दोन वेळा प्रतिसाद दिला नाही.
...................
नगरपालिकेचे अधिकारी आमच्या बालई परिसरातील नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. मागील महिनाभरापासून या भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. एकाच पाइपलाइनमधून परवानगी नसलेल्या इमारतींना नळजोडणी केल्याने आमच्या परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
-किरीट पाटील, नागरिक, बालई

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.