पिंपरी, ता. १३ ः पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यात भांबुर्डे गावाजवळ असलेला अवघड श्रेणीतील २०० फूट उंचीचा ‘भांबुर्डे नवरा’ हा सुळका साह्यकडा ॲडव्हेंचरच्या १३ गिर्यारोहकांनी नुकताच यशस्वीपणे सर केला. तसेच शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली.
साह्यकडा ॲडव्हेंचर संस्थेचे अध्यक्ष अनुभवी गिर्यारोहक बाबाजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरक्षित पार पडली. मोहिमेचे नेते विलास कुमकर आणि निखिल पोखरकर यांच्यासह नवोदित लीड क्लाईंबर सागर मांडेकर, श्रीराम पवळे, प्रगती चौधरी, श्रुतिका खांदवे, श्रीकांत नागवडे, स्वप्नील साळुंखे, शेखर हाळुंदे, समाधान वडघुले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाल गिर्यारोहक विराज चौधरी (वय १३ वर्षे) यांनी सहभाग घेतला.
विलास कुमकर याने प्रस्तरारोहणास सुरूवात केली. अरुंद चिमणीमधून म्हणजे कातळाला पडलेल्या भेगेच्या आधाराने आरोहण, नव्वद अंशातील प्रस्तर चढण, दुसऱ्या टप्प्यातील ३० फुटांच्या चढाईत प्रस्तराचा उभा सरळसोट भाग चढताना काटेरी टोकदार पाने असलेल्या वनस्पतीचा अडसर आणि शेवटच्या टप्प्यातील ९० फुटांची पूर्णपणे ‘स्क्री’ म्हणजेच माती आणि मोकळे दगड, गोटे मिश्रित प्रस्तर असे अवघड टप्पे पार करत गिर्यारोहकांनी ही चढाई केली. सुळका पादाक्रांत झाल्याने सर्व चमूने जल्लोष केला आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने सारा आसमंत दणाणून गेला.
PNE25U89688