पुणे, ता. १३ : कोरेगाव पार्क आणि व्हीआयपी विश्रामगृह या भागाला जोडण्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या साधू वासवानी रेल्वेमार्गावरील पुलाच्या बांधकामाचा मोठा अडसर महापालिकेला दूर करण्यात यश आले आहे. विश्रामगृहाच्या बाजूने असलेल्या १०० पेक्षा अधिक झोपड्या हटविण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. त्यामुळे उर्वरित जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या कामाला गती येणार आहे.
साधू वासवानी पूल बांधून ५० हून अधिक वर्षे उलटून गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. त्यामुळे हा पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी ८३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे; पण हा पूल नगर रस्ता, हडपसर, पुणे स्टेशन, स्वारगेट या भागात ये-जा करण्यासाठी सोईचा होता. हा पूल पाडल्याने परिसरातील नागरिकांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागणार होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पर्यायी व्यवस्था केल्यानंतर याठिकाणी काम सुरू झाले आहे.
महापालिकेने पुलाचा काही भाग आधी पाडला. या पुलालगत अनेक झोपड्या होत्या. त्यांना तेथून हटविल्यानंतर संपूर्ण पूल पाडता येणार होता. गेल्या काही महिन्यांपासून झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू होते. त्यास काही जणांनी विरोध केला होता. अखेर या नागरिकांची समजूत काढल्यानंतर महापालिकेने त्यांचे हडपसर येथे पुनर्वसन केले. त्यानंतर आता झोपड्या काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाने येथील झोपडीधारकांचे हडपसर सर्वे क्रमांक १३२ येथे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे या भागातील झोपड्या काढण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाचे काम आता वेगात सुरू होईल, असे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.