बीसीसीआय निवड समितीने 11 फेब्रुवारीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघात 2 बदल केले. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह याला पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं. तर बुमराहच्या जागी हर्षित राणा याचा समावेश करण्यात आला. तर दुसरा बदल हा क्रिकेट चाहत्यांना हादरवणारा आणि अनपेक्षित होता. टीम इंडियाच्या मुख्य संघात पर्यायी सलामीवीर म्हणून समावेश करण्यात आलेल्या यशस्वी जयस्वाल याला वगळण्यात आलं. त्याऐवजी चक्क स्पिनर वरुण चक्रवर्ती याला संधी देण्यात आली. “आम्हाला संघात विकेट घेणारा गोलंदाज हवा होता. त्यामुळे यशस्वीऐवजी वरुणला संधी देण्यात आली. तसेच यशस्वीकडे फार वेळ आहे”, असं स्पष्टीकरण टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याने सलामीवीर फलंदाजाला वगळण्याबाबत दिलं. यशस्वीला मुख्य संघातून राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.
यशस्वी जयस्वाल याची रणजी ट्रॉफी 2024-2025 या हंगामासाठी मुंबई संघात पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. मुंबईने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात उपांत्य फेरीत धडक मारली. मुंबईचा उपांत्य फेरीत विदर्भविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट निवड समितीने गुरुवारी 13 फेब्रुवारीला 18 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. यशस्वीचा या संघात संमावेश करण्यात आला आहे. यशस्वीची याआधी जम्मू काश्मिरविरुद्धच्या सामन्यासाठी संधी देण्यात आली होती.
यशस्वी विदर्भविरुद्ध खेळणार!
विदर्भविरुद्धच्या उपांत्य फेरीसाठी मुंबई संघ : अजिंक्य रहाणे (कप्तान), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकल, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद (विकेटकीपर), हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर आणि हर्ष तन्ना.