Dharashiv Politics : सत्ताधारी महायुतीत बिनसले आहे, याची प्रचीती धाराशिवकरांना दोन दिवसांपूर्वी आली. तुळजापूर येथील ड्रग्सप्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्याची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची पद्धत थेट गृहखात्याला 'टार्गेट' करणारी होती. त्यानंतर आता भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajgajitsinh Patil) यांनी ड्रग्सप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच लक्ष घातलेले आहे, असे म्हणत पालकमंत्री सरनाईक यांची कोंडी केली आहे.
जिल्ह्यात 'ऑपरेशन टायगर'पाठोपाठ ड्रग्सच्या प्रकरणातही शिवसेनेचे पालकमंत्री सरनाईक बॅकफूटवर गेले आहेत. पालकमंत्री सरनाईक हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर जिल्ह्यात आले होते. तुळजापुरातील ड्रग्स रॅकेटच्या प्रकरणावरून त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना अक्षरशः झापले होते. त्यांनी कारवाईसाठी पोलिसांना 72 तासांचा अल्टिमेटम दिला होता. पालकमंत्र्यांनी पोलिसांना ज्या पद्धतीने झापले, त्यामुळे गृहखाते निशाण्यावर आले होते.
सध्या महायुतीत 'कोल्ड वॉर' सुरू असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री सरनाईक यांनी त्यातूनच पोलिसांची अशा पद्धतीने कानउघाडणी केली असेल का, असा प्रश्न निर्माण झाला होता. तुळजापुरातीसल ड्रग्सप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे. ड्रग्सच्या तस्करीत कुणीही असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, कोणाच्याही जवळचा असेल, त्याला सोडून नका, अशा सूचना डिसेंबर 2024 मध्येच पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
ड्रग्सप्रकरणात कारवाई करावी, यासाठी तुळजापुरात आंदोलन करण्यात आले. या नागरिकांची आमदार पाटील यांनी शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आरोपी कुणीही असले तरी त्यांची गय केली जाणार नाही, याचा आमदार पाटील यांनी पुनरुच्चार केला. डिसेंबरमध्ये पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना ड्रग्सप्रकरणाची माहिती दिली होती, कारवाईची सूचना केली होती.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुळजापुरात बैठका घेत असताना नागरिकांनी ड्रग्स सेवन वाढल्याची माहिती दिली होती. त्याचवेळी कारवाई निश्चित होईल, असे मतदारांना आश्वस्त केले होते. त्यानंतर 28 डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षकांना माहिती देऊन कारवाईची सूचना केली होती, असे आमदार पाटील म्हणाले.
ही माहिती देत असताना या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे, असे आमदार पाटील यांनी आवर्जून सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातलेले असल्यामुळे प्रकरणाचा छडा लागेल, ड्रग्सचे जाळे पूर्णपणे नष्ट होईल, असेही ते म्हणाले. पोलिसांची कठोर शब्दांत कानउघाडणी करताना गृहखात्याला टार्गेट करण्याचा पालकमंत्री सरनाईक यांचा प्रयत्न होता, हे आमदार पाटील यांनी दिलेल्या माहितीमुळे स्पष्ट झाले आहे.
ज्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आधीच लक्ष घातले आहे, त्या प्रकरणात पालकमंत्र्यांनी पोलिसांनी कानउघाडणी केल्याने 'कोल्ड वॉर'ची प्रचीती आली आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार आहे. त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक सक्रिय आहे, मात्र या पथकाला तो सातत्याने चकवा देत आहे. याचा उल्लेख करत योग्य इंजेक्शन दिले की वाघ जाळ्यात येईल, असे पालकमंत्री सरनाईक म्हणाले होते. या आडून ते 'ऑपरेशन टायगर'बद्दल बोलत होते.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिवचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांना शिंदेंच्या शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या दोघांनीही सरनाईक यांना चकवा दिला आहे. पालकमंत्री म्हणून सरनाईक पहिल्यांदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले त्यावेळीही त्यांनी खासदार राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील महायुतीतच असल्याचे सांगून धक्का दिला होती. त्यावेळी या दोघांनीही सरनाईक यांच्या विधानाचा समाचार घेतला होता.
ताज्या दौऱ्यातही सरनाईक या दोघांबाबत बोलले. या दोघांना उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष घालणार आहेत, असे त्यांनी सांगितले होते. पालकमंत्री जिल्ह्याच्या अडचणी सोडवण्यासाठी येतात की फोडाफोडी करण्यासाठी, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे. ताज्या दौऱ्यातील सरनाईक यांच्या वक्तव्याचा ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी समाचार घेतला.
एका कार्यक्रमात बोलताना आमदार कैलास पाटील यांनी त्याच दिवशी सरनाईक यांना सडेतोड उत्तर दिले. आमदार पाटील आणि पालकमंत्री सरनाईकही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, मात्र घाई असल्याने पालकमंत्री निघून गेले आणि मग पाटील बोलले. आपल्या जिल्ह्यातले सर्व प्रश्न संपले आहेत का, लोकांच्या सर्व समस्या संपल्या आहेत, शेतमालाला भाव मिळत आहे का, असे प्रश्न उपस्थित करत आमदार पाटील यांनी 'ऑपरेशन टायगर'ची चिरफाड केली.
तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणात पोलिस अधीक्षकांना आधीच माहिती दिली होती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात आधीच लक्ष घातले आहे. कुणीही निवेदन देण्यापूर्वीच पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. पालकमंत्री लोकांचे प्रश्न सोडवणार, शेतमालाला भाव मिळवून देणार की पक्षांची फोडाफोडी करणार, असे प्रश्न ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केले. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे 'बॅकफूट'वर गेल्याचे दिसत आहे.