आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत टीम इंडिया आपला दुसरा सामना हा पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात बांगलादेशचा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. आता 23 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानवर मात करत विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न रोहितसेनेचा असणार आहे. उभयसंघातील हा सामना दुबईत होणार आहे. टीम इंडियाकडे हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याची सुवर्णसंधी आहे. या महत्त्वाच्या सामन्याआधी उपकर्णधार शुबमन गिल याने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिली. शुबमनला कर्णधार रोहितबाबत प्रश्न करण्यात आला. शुबमनने यावर रोखठोक प्रतिक्रिया दिली.
स्पर्धा कोणतीही असोत, क्रिकेट विश्वाचं लक्ष हे कायम टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याकडे असतं. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा होती. या सामन्याच्या पूर्वसंध्येला शुबमनला रोहित शर्माच्या स्फोटक सुरुवातीबाबत प्रश्न करण्यात आला. रोहित आणि शुबमन हे दोघे टीम इंडियासाठी ओपनिंग करतात. दोघांनी बांगलादेशविरुद्ध 229 धावांचा पाठलाग करताना 69 धावांची सलामी भागीदारी केली. यात एकट्या रोहितच्या 41 धावांचा समावेश होता.
रोहितने स्फोटक सुरुवात करण्याच्या प्रश्नावरुन शुबमन गिल म्हणाला की, ” त्याचा (रोहितच्या वेगात खेळण्याचा) माझ्यावर काहीच फरक पडत नाही. रोहित भाईची खेळण्याची एक पद्धत आहे. मला त्याच्यासोबत बॅटिंग करणं आवडतं. रोहितने वेगात सरुवात केली तर, मला त्यामुळे टिकून खेळण्याची संधी मिळते. त्याच्या सोबत बॅटिंग करणं मजेशीर आहे”, असं शुबमनने नमूद केलं.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान क्रिकेट टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान आणि सौद शकील.