पशू दवाखान्यात समस्यांचा डोंगर
नवीन इमारतीसाठी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
तळा, ता. २२ (बातमीदार) ः शहरातील परीट आळी येथे असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था दयनीय झाली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन असून, त्याच्या देखभालीसाठी योग्य असा दवाखाना नसल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तळा तालुका शेतकरी संघटनेने याकामी पुढाकार घेतला असून, पशुवैद्यकीय नवीन इमारत उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.
तालुक्यातील हा पशुवैद्यकीय दवाखाना अंदाजे २० ते २५ वर्षे जुना आहे. मात्र योग्य देखभालीअभावी इमारत गळकी झाली आहे. तसेच पडक्या व विस्कळित संरक्षण भिंती, काही ठिकाणी छप्पर नसल्याने दवाखान्याची पुरती दैना झाली आहे. त्यातच दवाखान्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने पशुमालकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तळा शहर आणि ग्रामीण भागात पशुधनाची संख्या मोठी आहे. दूध उत्पादनातही सर्वत्र मोठे काम सुरू आहे. यासाठी शासकीय पशुवैद्यकीय सेवादेखील तत्पर व मजबूत असणे गरजेचे आहे. मात्र शासकीय सेवा प्रभावी नसल्याने अनेकांना खासगी पशुवैद्यकांकडून आपल्या पशुधनावर उपचार करून घ्यावे लागत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच लम्पी स्किन या रोगाने पशुधनास जेरीस आणले असून, यामुळे मोठ्या प्रमाणात पशुधनाची हानी होत असल्याचे शेतकरीवर्गाकडून सांगण्यात येत आहे.
..................
रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरवस्था पाहायला मिळत आहे. पशुधनांना वेळेवर उपचार न मिळणे, त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडणे, पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरवस्था, दवाखान्यांमध्ये वीज आणि पाण्याची समस्या तसेच औषध, लस, चारा, बियाणे ठेवण्यासाठी जागा नसणे. दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आदी समस्यांना येथील पशुधन मालकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील पुशवैद्यकीय सेवा उत्तम करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. यासाठी मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.