नागपूर - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा वतीने शनिवारी (ता. २२) घेण्यात आलेल्या बारावीचा गणिताचा पेपर मोबाईलवर व्हायरल झाल्याची चर्चा रंगली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली.
पेपर सुरू होण्यापूर्वी गणिताचे काही प्रश्न सोशल मिडियावर आल्याचे पालकांना आढळले. त्यामुळे गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील सेक्शन ‘ए’चे प्रश्न व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, विभागाकडून त्याला नकार देत, ही केवळ अफवा असल्याचे सांगण्यात आले.
बोर्डाचा शनिवारी (ता.२२) सकाळी ११ ते दीड या दरम्यान गणिताचा पेपर घेण्यात येणार होता. मात्र पेपर सुरू होण्यापूर्वी शहरातील काही केंद्रांवर सकाळी १०.३० च्या सुमारास गणिताची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर फिरत असल्याची चर्चा सुरू झाली. ही प्रश्नपत्रिका ग्रामीण भागातील एखाद्या केंद्रावरून व्हायरल झाली असल्याचे सांगितले जात होते.
यावेळी व्हॉट्सॲपवर पेपरचा काही भाग दाखवून त्या ‘सेक्शन ए’मधील पर्यायवाचक प्रश्न नमूद करण्यात आल्याचेही सांगण्यात येत होते. यासाठी काही केंद्रांबाहेर तरुणांच्या संशयास्पद हालचालीही दिसून आल्याची माहिती आहे.
हा पेपर काहीच विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्याचीही चर्चा होती. मात्र, पेपर फुटीचा लाभ किती व कोणत्या विद्यार्थ्यांना झाला, याबाबत स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, या चर्चेने मंडळाच्या गोपनियतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
केद्रावर कुणाकडेही मोबाइल नको
दहावी आणि बारावीच्या केंद्रावर परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जमा करून घेतली जातात. मात्र, केंद्रप्रमुख, निरीक्षक शिक्षक व केंद्रांवर तैनात कर्मचाऱ्यांनाही मोबाइल असल्याचे दिसून येते. त्यांनाही मोबाइल नेण्यावर बंदी करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
आज दिवसभऱ्यात बारावीचा गणिताचा पेपर व्हायरल झाल्याची अफवा पसरविण्यात आली होती. मात्र, बोर्डाकडून या वृत्ताची तपासणी करण्यात आली. मात्र, असा कुठलाही प्रश्न व्हायरल झालेला नसून तसा कुठलाही ठोस पुरावा नाही. पालकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
- चिंतामण वंजारी, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर