शिवशाही बसला अपघात; पाच जखमी
जव्हार, ता. २२ (बातमीदार) : शिर्डीहून पालघरला जाणारी शिवशाही बस न्याहाळे खुर्द या गावानजीक उलटल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. एका भरधाव ट्रकने कट मारल्याने ही बस उलटली. या अपघातात पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून जखमींवर जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. जखमी प्रवाशांमध्ये दोन महिला, दोन वर्षांचा मुलगा व दोन पुरुषांचा समावेश आहे. हा अपघात नाशिककडे भरधाव वेगाने जात असलेल्या आयशर ट्रकने बसला कट मारल्याने झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.