ratchl२१४.jpg
२५N४६८३०
चिपळूण ः प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे स्वागत करताना आमदार निकम.
----
जबाबदारी दिलेल्या पदाधिकाऱ्यांवर लक्ष
खासदार सुनील तटकरे ः जो काम करील त्याला राष्ट्रवादी पक्षाकडून संधी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः पदाधिकाऱ्यांनी पक्षाने दिलेले कार्यक्रम कसे राबवले यावर लक्ष ठेवले जाईल. त्यामुळे प्रत्येकाने आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांना द्यायचा आहे. जो काम करील त्याला संधी मिळेल आणि जो काम करणार नाही त्यांचा वेगळा विचार होईल, असे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा आपण घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सावर्डे येथील बैठकीत दिली.
सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा झाला. या वेळी खासदार तटकरे म्हणाले, आता राष्ट्रवादीची सदस्यनोंदणी सुरू होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सदस्यनोंदणी करावी. आमदार, खासदारांच्या निवडणुका झाल्या आहेत. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे तो जास्त सभासद नोंदणी करील त्याचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल. पक्षाशी जो प्रतारणा करील त्याच्यावर कारवाई होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती करायची की, स्वतंत्र लढायचे, हा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. सध्या आपला पक्ष मजबूत केला पाहिजे. त्यावरच वाटाघाटी करताना आपण कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकू. आत्तापासूनच कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी सुरू करावी.
एकेकाळी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी येथे राष्ट्रवादीचे आमदार होते. आज रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे एक आमदार राष्ट्रवादीचा आहे. कोकणात राष्ट्रवादीने जेवढ्या जागा लढवल्या त्या जिंकल्या. त्यामुळे भाजपनंतर राज्यात राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जास्त आहे. जे चांगले काम करतील त्यांना कामे मागण्याचा अधिकार आहे. खासदार व प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण आपल्या पातळीवर पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी राहू. चिपळूण-संगमेश्वर मतदार संघासाठी आमदार म्हणून शेखर निकम आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील कार्यकर्त्यांना बळ मिळेल, असे सांगून शासनाकडून राष्ट्रवादीसाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही तटकरे यानी दिली. जिल्हाध्यक्ष जाधव यांनी जिल्ह्यात संघटनावाढीसाठी लक्ष द्यावे. संघटना असेल तरच आपल्याला यश मिळेल असे सांगितले.
....
हक्काचा निधी मिळावा
जिल्ह्यात पालकमंत्री येतात; मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण मिळत नसल्याचा मुद्दा शौकत मुकादमांनी माडला. त्यावर तटकरे म्हणाले, पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू याशिवाय महायुती म्हणून कोणताही पालकमंत्री असेल त्याने महायुतीमधील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना आपल्या जिल्ह्यात कार्यक्रम घेताना कळवले पाहिजे. राष्ट्रवादी पक्षाचा हक्काचा निधी त्याला मिळाला पाहिजे. जिल्हा नियोजनमधून महायुतीमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीला निधी मिळायला हवा.
---