रोजगारक्षम पिढी घडवण्यासाठी पुढचे पाऊल
कौशल्य विकास उपक्रमांवर पिंपरी चिंचवड महापालिकेचा भर
शैक्षणिक संस्थांसोबत करारासाठी अर्थसंकल्पात तरतूद
पिंपरी, ता. २२ : तरुणाईला स्वयंरोजगार निर्माण करण्यास सक्षम बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढचे पाऊल टाकले आहे. याबाबत अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. प्रामुख्याने खासगी शैक्षणिक संस्था तसेच कौशल्य विकास संस्थांसोबत संयुक्तीक करार पद्धतीने व्यावसायिक डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मुलींना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे.
मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि सिंबायोसिस स्किल युनिव्हर्सिटी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेतील मुलींसाठी ‘उत्पादन आणि स्वयंचलन’ या विषयातील दोन वर्षांचा डिप्लोमा यावर्षी सुरू करण्यात आला आहे. दरवर्षी यातील ६० मुलींचा खर्च महापालिका उचलणार आहे. उत्पादन, ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांमध्ये महिलांना संधी दिली जाणार आहे.
-------
‘लाइट हाऊस’ केंद्रांतून व्यवसायाभिमुख प्रशिक्षण
‘लाइट हाऊस’ उपक्रमातून युवक-युवतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी, बोपखेल, बोऱ्हाडेवाडी, दापोडी, नेहरूनगर, आकुर्डी, किवळे आणि चिखली येथे ‘लाइट हाऊस’ची केंद्र सुरू आहेत. येथे मुला-मुलींना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. या अंतर्गत आजपर्यंत ३ हजार १७६ युवकांना रोजगार देण्यात आला. आगामी आर्थिक वर्षात कौशल्य आत्मसात करण्यासाठी जास्तीतजास्त युवकांना प्रोत्साहित करण्याचा महापालिकेचा मानस आहे.
-------------
आवास योजनेसाठी जागेचा शोध
पंतप्राधान आवास योजनेंतर्गत महापालिकेने गरीब घटकातील नागरिकांना हक्काची घरे देण्यासाठी बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली, आकुर्डी, पिंपरी, डुडुळगाव येथे गृह संकुले बांधली. त्यातील तब्बल 4 हजार 858 घरांचे वितरण केले. आगामी वर्षात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी जागेचा शोध घेतला जाणार आहे. तेथे गृह संकुले उभारणीचे प्रयत्न असणार आहे.
--------
दिव्यांग भवनात सुविधा मिळणार
- दिव्यांग भवनात ‘डीबीएफ ईआरपी’ प्रणालीसह पेपरविरहित कामकाजासाठी सॉफ्टवेअर विकास
- ‘सीएसआर’ उपक्रमातून सेन्सरी पार्क, स्किलिंग सेंटर, दिव्यांगांच्या वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहन
- दिव्यांग भवन कम्युनिटी अॅप विकास
- अर्ली डिटेक्शन व इंटरव्हेन्शन, आरोग्य, शिक्षण, सरकारी योजना
- हायड्रोथेरपी युनिट
-----------
‘सक्षमा’ प्रकल्पाची उद्दिष्टे
मार्गदर्शन, देखरेखीसाठी मॉनिटरींग युनिट स्थापना
स्वयंसहायता गटांची क्षमता वाढवणे आणि कौशल्ये प्रदान
विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी प्रादेशिक स्तरावर महासंघ आणि क्लस्टर स्थापना
संपूर्ण प्रकल्पासाठी सर्व भागधारकांना समाविष्ट करुन देखरेख आणि मूल्यमापन मानकांचा विकास
उपजीविकेच्या विविध स्रोतांवर मार्गदर्शन प्रदान करुन उपजीविका मूल्यसाखळी निर्माण करणे