'छावा'च्या सवलतीला विरोध
esakal February 23, 2025 12:45 AM

मुंबई, ता. २२ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाला महाराष्ट्रभर तुफान प्रतिसाद मिळत आहे. युवापिढीला संभाजी महाराजांचा इतिहास कळावा, या उद्देशाने अनेक शैक्षणिक संस्था आणि राजकीय नेत्यांकडून हा चित्रपट मोफत दाखवला जात आहे; मात्र तिकिटांमध्ये सवलतीला विरोध करून वितरकाने सिंगल स्क्रीन चित्रपटगृह मालकांकडून पैसे वसुलीची भूमिका घेतल्याने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
‘छावा’ चित्रपटाच्या वितरकांची भूमिका दुटप्पी आहे. राज्यातील कोणत्याही ‘सिंगल स्क्रीन’ चित्रपटगृहात तिकीटदरात विशेष सूट न देण्याचे आदेश वितरकांनी दिले आहेत. जर कोणत्या चित्रपटगृहाने सूट दिली, तरी वितरक ते संपूर्ण पैसे वसूल करेल, अशी ऑगस्ट एंटरटेनमेंटने हेकेखोर भूमिका घेतली आहे. ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी अनेक शाळा आणि महाविद्यालयांतून चित्रपटगृह मालकांना तिकीटदरात सूट देण्याची विनंती केली जाते; मात्र वितरकांनी सूट दिल्यास चित्रपट बंद करण्याची धमकी दिली आहे. यामुळे सिंगल स्क्रीन थिएटर मालकांमध्ये असंतोष पसरला आहे. तसेच संभाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासही अडथळा निर्माण होत आहे, अशी तक्रार राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रातून केली आहे. तसेच यामुळे सिंगल स्क्रीन थिएटर मालक मोठ्या अडचणीत सापडले असून काहींनी ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे चित्रपटगृह मालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. यासंदर्भात ऑगस्ट एंटरटेनमेंट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
----
काही आमदार आणि शिक्षक लहान मुलांसाठी तिकीट बुक करताना थोडी सवलत द्यावी, अशी विनंती करतात; मात्र चित्रपटाच्या वितरकांकडून सवलतींमुळे उर्वरित रक्कम आम्हालाच भरावी लागेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आम्हालाही समजत नाही की काय करावे? आम्ही अकोला तालुक्यात राहतो. येथे आदिवासी लोकसंख्या अधिक असून पैसे नसल्याने हा चित्रपट पाहता येत नाही, अशी भूमिका अगस्ती चित्रमंदिरचे मच्छिंद्र धुमाळ यांनी घेतली आहे.
-------------------------------

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.