आंतरराष्ट्रीय मास्टर लीग टी20 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इंडिया मास्टर आणि श्रीलंका मास्टर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. अंबाती रायडु अवघ्या 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार सचिन तेंडुलकरही चाहत्यांचा अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. त्याचा डाव अवघ्या 10 धावांवर आटोपला. त्यानंतर इंडिया मास्टर्सची पडती बाजू गुरकिरत सिंग मन आणि स्टूअर्ट बिन्नी यांनी सावरली. या दोघांनी 80 हून अधिक धावांची भागीदारी केली. स्टूअर्ट बिन्नीने 31 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकारांच्य मदतीने 68 धावा केल्या. त्यानंतर मधल्या फळीत युवराज सिंग आणि युसूफ पठाण यांची जोरदार फटकेबाजी केली. युसूफ पठाणने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 6 षटकार आणि 3 चौकार मारले. इंडिया मास्टर्सने 20 षटकात 4 गडी गमवून 222 धावा केल्या आणि विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान श्रीलंका मास्टर्स गाठणार का? याकडे लक्ष लागून आहे.
युसूफ पठाण 42 वर्षांचा असून त्याच्या फलंदाजीला अजूनही धार असल्याचं दिसून आलं आहे. युसूफ पठाण त्याच्या क्रिकेट कारकिर्दित 57 वनडे आणि 22 टी20 सामने खेळला आहे. तर 174 आयपीएल सामने खेळला आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 2 शतकं आणि 3 अर्धशतकं ठोकली असून 810 धावा केल्या आहेत. तर टी20 236 धावा केल्या आहेत. युसूफ पठाण त्याच्या क्रिकेट कारकिर्दित एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
श्रीलंका मास्टर्स (प्लेइंग इलेव्हन): कुमार संगकारा (विकेटकीपर /कर्णधार), उपुल थरंगा, लाहिरू थिरिमाने, असाला गुणरत्ने, जीवन मेंडिस, आशा प्रियरंजन, चतुरंगा डी सिल्वा, इसुरु उडाना, सुरंगा लकमल, सीकुगे प्रसन्ना, नुवान प्रदीप.
इंडिया मास्टर्स (प्लेइंग इलेव्हन): सचिन तेंडुलकर (कर्णधार), गुरकीरत सिंग मान, युवराज सिंग, अंबाती रायुडू (विकेटकीपर), युसूफ पठाण, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, शाहबाज नदीम, विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, धवल कुलकर्णी