IND vs PAK : भारत-पाक सामन्याआधी 30 मिनिटांपूर्वी निकाल स्पष्ट होणार! कसं काय? जाणून घ्या
GH News February 23, 2025 01:06 AM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी दुबई सज्ज झाली आहे. उभयसंघातील सामना हा दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान पलटवार करत टीम इंडियाविरुद्ध विजयाचं खातं उघडण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर टीम इंडिया बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानवर मात करत सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.मात्र सामना सुरु होण्याआधीच कोण जिंकणार हे निश्चित होणार आहे, असं आम्ही नाही, तर येथील आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय.

सामन्याच्या 30 मिनिटांपूर्वी भारत-पाकिस्तान या सामन्यातील विजयी संघ कोण? याचा अंदाज बांधता येऊ शकतो. टॉस दुपारी 2 वाजता होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ निश्चित करण्यात टॉस फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. टॉस जिंकल्यानंतर येथील आकडेवारीनुसार बॅटिंग घ्यावी की बॉलिंग? हे आपण जाणून घेऊयात.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये दव पडत नाही, त्यामुळे गोलंदाजीदरम्यान कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही. दोन्ही संघांच्या कर्णधारांचा आपल्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागावा, अशी इच्छा असणार आहे. दुबईतील आकडेवारी पाहता टॉस जिंकणारा संघ पहिले बॉलिंग घेऊ शकतो.

दुबईतील गेल्या 10 सामन्यांमधील आकडेवारी

दुबईत गेल्या 10 सामन्यांमध्ये टॉस जिंकून 7 वेळा पहिले फिल्डिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. दुबईत आतापर्यंत एकूण 58 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 35 सामन्यांत पहिले फिल्डिंग करणारी टीम जिंकली आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार, दुबईत टॉस जिंकून पहिले फिल्डिंग घेणाऱ्या संघाला विजयी होण्याची अधिक संधी आहे, असं म्हणू शकतो.

भारताची दुबईतील आकडेवारी

दरम्यान टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळलेल्या 7 पैकी 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर फक्त एकदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच टीम इंडियाने 6 पैकी 5 सामने हे विजयी धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान क्रिकेट टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान, इमाम उल हक आणि सौद शकील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.