कोणता खेळाडू करणार मोठा चमत्कार?, भारत-पाक सामन्यापूर्वीच शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी; कुणाची उडवली झोप?
GH News February 23, 2025 02:08 PM

आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या पाचव्या सामन्यात महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये दुबईत महासामना रंगणार आहे. भारत-पाकिस्तानचा सामना बऱ्याच महिन्यानंतर होत असल्याने दुबईत दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी आणि दिग्गजांनी मोठी गर्दी केली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही दुबईत आला आहे. एवढेच नव्हे तर टीम इंडियाचा युवा स्टार अभिषेक शर्माही मॅचचा आनंद लुटण्यासाठी दुबईत दाखल झाला आहे. यावेळी शोएब आणि अभिषेकची भेट झाली. यावेळी शोएब अख्तरने युवा फलंदाज अभिषेक बाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

आयआयटीवाले बाबाने भारत-पाकिस्तान सामन्याबाबत भविष्यवाणी केली होती. त्यांनी या सामन्यात पाकिस्तान जिंकणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली होती. नेटकऱ्यांनी आयआयटीवाल्या बाबांना चांगलंच ट्रोल केलं होतं. पण आता शोएब अख्तर याची भविष्यवाणीही चर्चेत आली आहे. शोएबने ही भविष्यवाणी कोणत्याही संघाबद्दल केली नाही. तर एका खेळाडूबाबत केली आहे. तो खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा. अभिषेककडे अनन्यसाधारण प्रतिभा आहे. येत्या काळात अभिषेक टीम इंडियासाठी मोठा चमत्कार करेल, असं शोएब म्हणाला.

नशीब मी आता जन्मलो नाही

या काळात जन्माला आलो नाही, याचा मला आनंद आहे. लोक या तरुण फलंदाजाला प्रचंड पसंत करतात. याचं कारण म्हणजे त्याने केलेलं धुंवाधार शतक. त्याची शतकी खेळी मी पाहिली. अभिषेकची शतकी खेळी अत्यंत अमेजिंग होती. फँटास्टिक होती, असं त्याने सांगितलं.

तो भारताचा उगवता तारा

यावेळी शोएबने अभिषेकला काही खास टिप्सही दिल्या आहेत. मी अभिषेकला दोन तीन सल्ले दिले आहेत. आपल्या क्षमतेचा (ताकदीचा) विसर पडू देऊ नको. जे लोक तुझ्यापेक्षा चांगले आहेत, त्यांनाच मित्र बनव, असं मी त्याला सांगितलं. या युवा खेळाडूसमोर अद्भभूत भविष्य आहे. त्यासाठी मी त्याला शुभेच्छा देत आहे. पुढे पुढे सरकत जा, यश संपादित कर आणि आणि अनेक विक्रम मोडीत काढ. तो भारताचा एक उगवता तारा आहे, असं शोएब म्हणाला.

अभिषेकची नेत्रदीपक कामगिरी

अभिषेक शर्मा भारतीय टीमसाठी टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याने संघासाठी आतापर्यंत 17 टी20मध्ये भाग घेतला आहे. यात त्याला 16 वेळा संधी मिळाली. यावेळी त्याने 33.43 च्या सरासरीने 535 धावा केल्या आहेत. टी20मध्ये त्याच्या नावे दोन शतक आणि दोन अर्धशतक आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.