एका वृद्धेची हत्या करून तिचे दागिने लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक कोल्हापुरातील गडहिंग्लजमध्ये घडली आहे. आधी ६२ वर्षीय वृद्ध महिलेच्या तोंडात बोळा कोंबला. नंतर तिची हत्या केली आणि ११ तोळं सोन्याचे दागिने लुटले. पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचा मृतदेह सोलापुरे वसाहतीजवळील एका विहिरीत ढकलून दिला. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. आरोपीचा तपास पोलीस करीत आहेत.
वृद्ध महिलेचे नाव शोभा सदाशिव धनवडे असे आहे. त्या ६२ वर्षांच्या होत्या. शोभा धनवडे यांचे पती सदाशिव आणि मुलगा मारुती यांचे धान्याचे दुकान आहे. सदाशिव पत्नीसह कंपोस्ट डेपो रोडवरील बंगल्यात, तर मारुती हे पत्नी आणि मुलांसह धील फ्लॅटमध्ये राहतात. शनिवारी रात्री दहा वाजता दुकान बंद करून दोघेही आपापल्या घरी गेले. साडेदहा वाजता घरात शोभा दिसत नसल्यानं त्यांनी मुलाकडे धाव घेत मारूती यांना माहिती दिली.
साडेअकराच्या सुमारास मारुती वडिलांच्या घरी गेला. फोनवरून नातेवाईकांकडे चौकशी केली. परंतु, त्यांचा शोध लागला नाही. शोभा यांच्याकडे असलेला मोबाईलही साडेअकरा नंतर बंद लागला. मध्यरात्री दोनच्या सुमारास यांनी पोलिसांना फोन करून आई बेपत्ता असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी वृद्ध महिलेचा शोध सुरू केला. दरम्यान, अशोक आजरी यांना शेतातील विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला. याची माहिती मारुती आणि पोलिसांना दिली. रेस्क्यू टीमने मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शोभा यांचाच असल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा आणि डाव्या बाजूला गळा आवळलेले व्रण दिसले.
तसेच त्यांच्या अंगावर ६ तोळ्याचे गंठण, अडीच तोळ्याचे मंगळसूत्र, ७ ग्रॅमची प्रत्येकी १ अंगठी, कानातील १ तोळ्याची कर्णफुले दिसली नाहीत. त्यामुळे दागिन्यांसाठीच आज्ञात व्यक्तीने शोभा धनवडे यांचा हत्या केल्याची तक्रार मारुती धनवडे यांनी नोंदवली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.