नाशिक : पुणे-नाशिकदरम्यानच्या सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मार्ग बदलल्याने त्या विरोधात पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी एकवटले आहेत. कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. पुढील दिशा ठरविण्यासाठी समितीची पहिली बैठक ३ मार्चला मुंबईत बोलाविण्यात आली असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.
पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पात जुन्नर तालुक्यातील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) प्रकल्प येत असल्याने हा मार्ग रद्द करून पुणे, अहिल्यानगर, शिर्डीमार्गे नाशिक असा हा मार्ग होणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. पूर्वीच्या रेल्वेमार्गामुळे ‘जीएमआरटी’ केंद्राच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केल्याने त्यात बदल सुचविण्यात आला, मात्र हा रेल्वेमार्ग मूळ नियोजनानुसारच व्हावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग मूळ नियोजनानुसारच झाला पाहिजे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येत लढा देण्यासाठी कृती समिती स्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी ३ मार्चला मुंबईत बैठक होत आहे. - सत्यजित तांबे, आमदार
यामुळे हवा पूर्वीचाच मार्गनवीन मार्गिकेमुळे ७०-८० किलोमीटर अंतर वाढणार
सरळमार्गी केल्यास सेमी हायस्पीडच्या मूळ उद्देशालाच हरताळ
पुणे- नाशिक- मुंबई सुवर्णत्रिकोण साध्य होण्यासाठी सरळ मार्गानेच प्रकल्प गरजेचा
‘जीएमआरटी’मुळे निर्माण होणारी अडचण बोगदा, इतर पर्यायाने सोडविणे शक्य