मुंबई : ‘‘साहित्य महामंडळ खंडण्या घेऊन संमेलन भरवत आहे. या साहित्य संमेलनात जी राजकीय चिखलफेक झाली आहे त्याची जबाबदारी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी स्वीकारून त्याचा निषेध करावा,’’ अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी आज केली. या संमेलनात ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि राजकीय चिखलफेक झाली त्यामुळे शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असल्याने ते देखील तितकेच जबाबदार आहेत, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, ‘‘हे साहित्य संमेलन नव्हते, यात राजकारण झाले. व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना का बोलावण्यात आले नव्हते? नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य ही त्यांची विकृती आहे. ज्या घरात तुम्ही खाल्ले, आमदार झालात त्याविरोधात आज का बोलत आहात? चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. त्या बाईंचे कर्तृत्व काय? पुण्याचा विकास आराखडा बनविण्याचे काम सुरू होते, त्यावेळी या बाईने कोट्यवधी रुपये गोळा केले.’’ गोऱ्हे यांच्या विधानावर संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनीसुद्धा निषेध व्यक्त केला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.
प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत. साहित्यिकांना वारंवार असे वाटते की राजकारण्यांनी आमच्या स्टेजवर येऊ नयेत. मग त्यांनीही पक्षांच्या दृष्टिकोनातून टिपणी करू नयेत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
‘मी ध्यानात ठेवेन...’महादजी शिंदे पुरस्कार देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याबद्दल ठाकरे गटातून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत बोलताना शरद पवार यांनी, ‘मी कोणाचा सत्कार करायचा हे जर अन्य कोणी ठरवत असतील, तर ही गोष्ट मी ध्यानात ठेवेन’, असा टोला लगावला.