रणवीर अलाहाबादीयाची पाच तास कसून चौकशी
esakal February 25, 2025 11:45 AM

रणवीर अलाहाबादीयाची पाच तास कसून चौकशी

मुंबई, ता.२४ : इंडिया गॉट लेटेंट या रिॲलीटी शोमधील बीभत्स, आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल सोमवारी (ता.२४) सायबर महाराष्ट्रने रणवीर अलाहाबादीया आणि आशीष चंचलानी यांची सुमारे पाच तास कसून चौकशी केली. यावेळी त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. तसेच निकड भासल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल, अशी सूचना देत त्यांना सोडण्यात आले. हे दोघे स्वतंत्रपणे सायबर महाराष्ट्रच्या नवी मुंबई येथील कार्यालयात सोमवारी हजर झाले. यावेळी रणवीर याने माध्यमांपासून चेहरा लपवण्यासाठी मुखपट्टी बांधली होती.

रणवीर यास अटक न करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलास दिला असला तरी त्यास पोलिस तपासास सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शिवाय पासपोर्ट ठाणे पोलिसांकडे जमा करावा, परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही, असेही बजावले. या शोमध्ये परीक्षक म्हणून सहभागी झालेल्या यूट्यूबर रणवीर याने केलेले वक्तव्य समाजमाध्यमांवरून देशभर पसरले आणि संतापाची तीव्र लाट पसरली. यापुर्वी निर्माता रघु रामसह अन्य काहींचे जबाब सायबर विभागाने नोंदवले आहेत. तर अभिनेत्री राखी सावंतसह काहींना जबाब नोंदवण्यासाठी समन्स जारी करून हजर राहण्याची सूचना केली आहे. या घटनेची दखल केंद्रीय महिला आयोगानेही घेतली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.