कऱ्हाड : जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलिस ठाण्यात कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचा समावेश होतो. त्याचबरोबर या पोलिस ठाण्यावर कामाचाही मोठा ताण असतो, असे असले, तरी या पोलिस ठाण्याला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. तपासासाठीही पथके बाहेर गावी जातात. त्यामुळे येथील पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिसांवरच कामाचा ताण असतो. त्यातच बंदोबस्त आणि दैनंदिन कामामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टीही मिळणे मुश्कील होते. त्यासाठी येथील पोलिस ठाण्याला पुरेशा मनुष्यबळाची गरज आहे.
शहरात यापूर्वी झालेल्या घटनांवरून पोलिस दरबारी कऱ्हाडची संवेदनशील शहर म्हणून नोंद आहे. येथील पोलिसांना सातत्याने अलर्ट राहावे लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सातत्याने सर्व शहरातील घटना- घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे येथील पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात काम असते. त्यामुळे येथील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण कायमच असतो. त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ येथील पोलिस ठाण्याला असणे आवश्यक असते.
या पोलिस ठाण्यांतर्गत कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सातत्याने कोणता- ना कोणता तरी बंदोबस्त असतो. त्याचबरोबर अनेकदा या शहरात व हे शहर महामार्गावर असल्याने शहराजवळून जाणाऱ्या मंत्र्यांची संख्या जास्त आहे. अशावेळी संबंधितांसाठी बंदोबस्त ठेवावा लागतो. परीक्षा, मोर्चे, आंदोलने, सभा, सण-उत्सव यासाठी सातत्याने बंदोबस्त असतोच. त्यामुळे येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसांना दैनंदिन कामे करून या बंदोबस्ताचा ताण सहन करावा लागतो. अनेकदा साप्ताहिक सुट्टीही मिळणे मुश्कील होते.
अशी आहे पोलिसांची स्थिती मंजूर कर्मचारी संख्या - २२८
उपलब्ध कर्मचारी संख्या - १५२
प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी - २८
रिक्त असलेले कर्मचारी - ७६
दररोज कामासाठी उपलब्ध कर्मचारी - सरासरी १००