मायणी : येथील वडूज रस्त्यालगत पावकता भागातील शिवाजी कोंडिबा मासाळ यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरातील चार तोळे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ती घटना आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील वडूज रस्त्याला पावकता नावाच्या शिवारात मुख्य रस्त्यापासून जवळच शिवाजी कोंडिबा मासाळ यांचे राहते घर आहे. घराला कुलूप लावून मासाळ कुटुंबीय घरामागील शेतामध्ये काम करत होते. दरम्यान, घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटे मासाळ यांच्या घरात घुसले.
काही वेळात ट्रॅक्टर घेऊन अन्यत्र कामासाठी गेलेला त्यांचा मुलगा अर्जुन मासाळ घरी परतला. त्या वेळी घराच्या दिशेने येत असलेल्या ट्रॅक्टरच्या आवाजाने आतील चोर सावध झाले. त्यांनी घराबाहेर पळ काढला. त्या वेळी अर्जुनने आरडाओरड करीत त्यांच्या दिशेने दगड भिरकविला. मात्र, घराजवळच उभ्या केलेल्या दुचाकीवरून तिघा चोरट्यांनी विट्याच्या दिशेने पलायन केले.
घटनेची माहिती देताच सहायक पोलिस उपनिरीक्षक विक्रांत पाटील यांच्यासह कर्मचारी व पोलिस पाटील प्रशांत कोळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेत घराची पाहणी केली. ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, काही दिलासादायक माहिती हाती आली नाही. पुढील तपास विक्रांत पाटील करीत आहेत.
दरम्यान, भर दुपारी घरांमध्ये चोऱ्या होऊ लागल्याने राना मळ्यातील शेतकरी वर्ग, रहिवासी भयभीत झाले आहेत. दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी आज चोरी झालेल्या ठिकाणाच्या बरोबर विरुद्ध दिशेला (पूर्वेला) अशीच भरदुपारी आनंदा माने यांच्याही घरी चोरट्यांनी डल्ला मारला होता. त्यावेळीही सुमारे नऊ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे चोरट्याने पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.