Amravati News : मृत सावकाराच्या परवान्यावर अवैध सावकारी; दोन महिलांविरुद्ध कारवाईचा बडगा
esakal February 26, 2025 06:45 AM

अमरावती - परवानाधारक सावकाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या परवान्यावर अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध सहकार विभागाने कारवाईचा बडगा उगारला. सहकार विभागाच्या तीन पथकांनी तीन जागी धाडी घालून एका जागेवरून विविध बॅंकांचे धनादेश, शंभर रुपयांचे कोरे स्टॅम्पपेपर व दहा दुचाकी जप्त केल्या. दोन महिन्यांतील हा चौथा छापा असून सात जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

अमरावती शहरातील महाजनपुरा परिसरातील आनंदनगर येथील रहिवासी अजय राजू बाबर हे परवानाधारक सावकार होते. त्यांच्या मृत्यूनंतर दोन महिला त्यांच्या परवान्यावर अवैधरीत्या सावकारी व्यवसाय करीत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाली होती. त्यानुषंगाने त्यांनी तीन सहायक निबंधकांच्या नेतृत्वात तीन स्वतंत्र पथक गठित करून छापे घालण्याचे आदेश दिले.

या पथकाने तीनही जागी छापे घालून एका महिलेच्या घरून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. ही कागदपत्रे मृत अजय बाबर यांच्या हयातीतील आहेत. त्यांनी जिवंत असताना अधिकृत सावकारी परवाना असतानाही कर्जदारांच्या स्वाक्षरी असलेले विविध बॅंकांचे कोरे धनादेश, शंभर रुपयांचे कोरे स्टॅम्पपेपर व आरसी कागदपत्रे असलेल्या दहा दुचाकी घेऊन ठेवल्या होत्या. हा सर्व दस्तवेज संबंधित महिलेच्या निवासस्थानी त्यांनी ठेवला होता. त्यामुळेच आनंदनगर येथील त्यांच्या दुकानात अवैध दस्तवेज सापडू शकले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पथकाने तीन जागी छापे घातले. सहायक निबंधक स्वाती गुडधे यांच्या नेतृत्वातील पथकाने महिलेच्या घरून आक्षेपार्ह कागदपत्रांसह दहा दुचाकी जप्त केल्यात. दुसरा छापा आनंदनगर येथील महिलेच्या निवासस्थानी सहायक निबंधक राजेश यादव यांच्या नेतृत्वात घालण्यात आली. मात्र या महिलेच्या घरून आक्षेपार्ह कागदपत्रे किंवा दस्तावेज सापडले नाहीत, तर तिसरा छापा आनंदनगर येथील मृत अजय बाबर यांच्या दुकानात सहायक निबंधक प्रीती धामने यांच्या नेतृत्वात घालण्यात आला. तेथेही आक्षेपार्ह काहीच सापडले नाही.

या प्रकरणाची पुढील चौकशी उपनिबंधक सचिन पतंगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मृत अजय बाबर यांच्या कायेदशीर वारसांना चौकशीकरिता बोलावून बाबर यांचा सावकारी परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सहकार अधिकारी अविनाश महल्ले यांनी सांगितले.

दोन महिन्यांत नऊ जणांविरुद्ध कारवाई

गेल्या दोन महिन्यांत अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध सहकार विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये मोर्शीमधील दोन महिला सावकारांसह चार जणांचा समावेश आहे. ३० जानेवारीस अमरावतीमधील मुकुंद पुसतकर, प्रकाश पुसतकर, १४ फेब्रुवारीस मोर्शीतील सुधीर पाचारे व सुनील निंभोरकर, तर १० जानेवारीस मोर्शीमधील दोन महिला सावकारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आता अमरावती शहरातील दोन महिलांविरुद्ध अवैध सावकारीच्या विरोधात कारवाई केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.