देवगड - कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्ताने आजपासून (ता.२६) दोन दिवस यात्रा भरत आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, भाविकांच्या स्वागतासाठी देवस्थानसह पोलिस तसेच प्रशासन सज्ज आहे. यात्रेनिमित्ताने मंदिर व परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. यात्रेत विविध व्यापारी, हॉटेल व्यावसायिक दाखल झाले आहेत.
रात्री उशिरा मंदिरात विधीवत पूजा होऊन यात्रेला प्रारंभ झाला. मंदिर पहाटेपासून दर्शनासाठी खुले होईल. समुद्रस्नानासाठी गुरुवारी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मंदिर तसेच भक्तनिवास परिसरात दर्शन रांगेची व्यवस्था आहे. दर्शन मार्गावर तसेच मंदिराच्या परिसरात मंडप घातला आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांची यंत्रणा कार्यरत केली आहे.
आज (ता. २६) सायंकाळी विविध देवस्वाऱ्या भेटीला येणार असल्याने त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. समुद्रकिनारी खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल लागले आहेत. तेथेही विद्युत रोषणाई आहे. बंदोबस्तासाठी पोलिस फौजफाटा कुणकेश्वरला दाखल झाला आहे. एसटीने हंगामी आगार उभारले आहे. खासगी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आहे. तारामुंबरी मिठमुंबरी पुलावरून कुणकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठीही नियोजन आहे. आरोग्य विभागानेही आढावा घेतला. देवस्थानची मंडळी यात्रा नियोजनात व्यस्त आहेत. भाविकांच्या स्वागतासाठी सारे सज्ज आहेत.
दहा देवस्वाऱ्या भेटीला
यात्रेत श्री देव रामेश्वर (आचरा), श्री पावणादेवी (शिरगाव), श्री गांगेश्वर (नारिंग्रे), श्री देव माधवगिरी (माईण कणकवली), श्री देव गांगेश्वर (बावशी बेळणे, कणकवली), श्री देव जैनलिंग रवळनाथ महालक्ष्मी पावणादेवी गांगो (बिडवाडी, कणकवली), श्री दिर्बादेवी श्री रामेश्वर (जामसंडे), श्री गांगेश्वर पावणाई भावई (दाभोळे), श्री पावणादेवी (हुंबरठ, कणकवली), श्री देव रामेश्वर (मिठबांव) आदी दहा देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीला येणार असल्याची माहिती देवस्थानतर्फे देण्यात आली.