उल्हासनगर - अल्पवयीन मुलीसोबत थाटण्यात आलेला बालविवाह चाईल्ड लाईनने रोखला आहे. याप्रकरणी उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यात मुलीचे आईवडील, सासू सासरे व बोहल्यावर चढू पाहणाऱ्या नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलीला बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.
सोमवारी रात्री कॅम्प नंबर 5 मध्ये असलेल्या एका हॉलमध्ये बालविवाह थाटण्यात आल्याची माहिती ठाणे चाईल्ड लाईनला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उल्हासनगरात धाव घेऊन हा बालविवाह रोखला.आणि चाईल्ड लाईनच्या श्रद्धा नारकर यांनी दिलेल्या फिर्याद वरून मुलीचे आईवडील, सासू सासरे, नवरदेव यांच्या व्यतिरिक्त आणखीन 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राणी बैसाने, सदस्य मनीषा झेंडे यांनी संबंधितांवर बालविकास कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश मोरे करत असून संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
'अख्ख वऱ्हाड बालकल्याण समितीच्या आवारात जमा'
गुन्हा दाखल झाल्यावर मुलीला बालकल्याण समितीकडे देण्यात आल्यावर अख्ख वऱ्हाड समितीच्या आवारात जमा झाले. अल्पवयीन मुलगी ही स्थानिक असून नवरदेव सोलापूरचा आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत नव्हते. असे नवरदेवाच्या मंडळींकडून सांगण्यात आले.
तर मुलीने पुढे काही चुकीचे पाऊल उचलले तर या धाकधूकीने तिचा विवाह लावून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मुलीच्या आईवडिलांनी बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राणी बैसाने, सदस्य मनीषा झेंडे यांना दिली. मुली विषयी चिंता व्यक्त करतानाच तिचा अल्पवयीन वयात विवाह लावून देणे हे त्यावर सोल्युशन नाही अशी प्रतिक्रिया राणी बैसाने यांनी व्यक्त केली.