Amravati Crime : मित्रासोबत बाहेर जाताना घेरलं, माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; मस्साजोगचं लोण हळूहळू इतर जिल्ह्यात
Saam TV February 27, 2025 03:45 AM

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्येच्या घटनेची आग अजूनही धगधगत आहे. आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. आरोपी मोकाट असून, त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी, नेते मंडळींपासून सामान्य व्यक्तीही करत आहेत.

अशातच आणखी एका माजी सरपंच यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या उपराई येथील माजी सरपंच यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नसून, गावकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील उपराई येथील माजी सरपंच यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. नीरज नागे असे माजी सरपंच यांचं नाव असून, त्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या घरकुल यादीमध्ये लाभार्थ्यांचं नाव न आल्यामुळे माजी सरपंच यांना केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सायंकाळी मित्रासोबत घराबाहेर जात असताना काही लोकांनी नीरज नागे यांना घेरलं. नंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मारहाण झाल्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक उपचार घेण्यासाठी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती गंभीर असल्यानं येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं.

या संतापजनक प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत पोलिसांकडून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने गावातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जातोय. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी देखील होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.