Marathi Abhijat Bhasha: गिरगांवातल्या शाळेत होणार 'अभिजात मराठी' ची गर्जना! १ हजारांहून अधिक मराठी गाण्यांची रंगदार मैफिल
Saam TV February 27, 2025 03:45 AM

२७ फेब्रुवारी हा दिवस साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजे 'विष्णू वामन शिरवाडकर' ह्यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये तसेच अन्य ठिकाणी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा देण्यात आला आहे.

याचेच अवचित्त साधून अश्याच एक कार्यक्रमाचे आयोजन गिरगांव मधल्या नामांकित चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी '०७ वाजून ०१ मिनिटे' सूर्योदयापासून ते सायंकाळी '०६ वाजून ०४ मिनिटे' सूर्यास्ता पर्यंत सलग १ हजाराहून अधिक गाण्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमात शिशुवर्गापासून ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी तसेच शिक्षक वर शिक्षकेतर सहकारी असे एकूण १ हजार १२ जण ह्या कार्यक्रमात सादर करणार आहेत. भावगीते, भक्ती गीते, लोकगीतांचा समावेश ह्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे गाण्यांना वाद्यवृंदावर साथ करण्यासाठी शाळेतलेच विद्यार्थी असणार आहेत व त्या सर्वांना मार्गदर्शन शाळेचे माजी कल्पेश वेदक, सिद्धांत चासकर आणि सचिन कोलवेकर करणार आहेत.

या कार्यक्रमाची माहिती 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला' सुद्धा देण्यात आली असून कार्यक्रमावेळी त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. गेल्या २ महिन्यांपासून ह्या कार्यक्रमाच्या दृष्टीने जय्यद तयारी सुरू आहे.

पालक, माजी विद्यार्थी, हितचिंतक यांनी उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे आणि विद्यार्थाना प्रोत्साहित करावे असे आवाहन चिकिस्तक समूह शिरोळकर हायस्कूल मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका संचिता गावडे आणि पर्यावेक्षक संतोष मांजरेकर यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.