ढिंग टांग
डिअरम डिअर होम्मिनिष्टर साहेब यांसी म. पो. कॉ. बबन फुलपगार, (उमर सत्तेचाळीस, वजन बुटासकट सत्तेचाळीस, कदकाठी ५ फू. ६ इं, छाती सव्वीस, फुगवून सव्वीसच) याचा कडक साल्युट. पत्र लिहिणेस कारण कां की, सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आत्यंतिक जिकिरीचा जहाला असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला नाही, अशी पब्लिकमध्ये बोलवा आहे. म. पो. दल हे कार्यक्षम पोलिसदल असून स्कॉटलंड यार्डवालेसुध्दा त्यांना (भेटल्यास) सलाम मारतात, असे ऐकून आहे. तरीही गुन्हेगार व समाजकंटक व गावगुंड, तसेच चाप्टर लोकांना पोलिस म्हणजे काहीच नाही, असे वाटू लागले आहे.
दिवसाढवळ्या गुन्हेगार माजल्यागत वागू लागले आहेत. यामुळे पोलिसांची इमेज खराब होते आहे. तरी यावर आर्जंटमध्ये आर्जंट उपावयोजना करावी, अशी विनंती सदरील निवेदणाद्वारे करणेत येत आहे.
साहेब, श्रीमंतांची पोरेटोरे आलिशान गाड्या भरधाव चालवत सामाण्य मान्सांना कुचलतात. साळंत जानाऱ्या लहान्या पोरींनाही विकृत मानसे सोडत नाहीत. रात्रीअपरात्री बसगाड्यांमध्ये नराधम आयाबहिणींची अब्रू घेतात. भुरटे चोर रातच्या टायमाला फिल्मष्टारच्या घरात शिरुन चोऱ्याबिऱ्या करतात. दिवसाढवळ्या पोरं भर रस्त्यात राडा करुन येकमेकांचा जीव घेतात. कुनीही उठतो, कुनालाही फोन करुन जीवाच्या धमक्या देतो. हे समदे काय चालू आहे? कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचीच ही लक्षने आहेत.
अशा परिस्थितीत पोलिसांनी काय करावे? त्यांचे हात बांधलेले आहेत, साहेब. ते तरी काय करनार? यासाठी गुन्हेगारांना वचक राहावा अशी उपावयोजना करायला हवी. गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार दन्नाट पळून गायब होतात. इतक्या जोरात पळन्याचे ट्रेनिंग यांना कोन देते? हे शोधले पाहिजे. हल्ली तर गुन्हेगार गुन्हा करुन झाल्याबरोब्बर मोबाइल स्विच ऑफ करुन शेतात जाऊन लपतात, असे आढळून आले आहे. शेतात जाऊन लपने हा अतिशय गंभीर गुन्हा आहे, हे त्यांना माहीत असायला हवे! फिल्मष्टार सैफ अली खान याच्या घरी चोरी करुन पळालेला इसम हा ठाण्याजवळच्या शेतात जाऊन लपला होता.
शेतात इसम लपला की सापडायला कठीन जाते. डॉग स्क्वॉडवालेही शेतात घुसायला कुचकूच करतात. एक म्हणता एक व्हायचे!! शेतात जाऊन मोबाइल फोन स्विच ऑफ केला की लोकेशन सापडून येत नाही. ड्रोन वापरुन तपास करताना एक-दोन वेळा ड्रोन शेतात पडल्याने तो आनायला कोन जानार? अशी सिच्युशन निर्मान झाली. मग पोलिसांनी काय करावे? तरी गुन्हेगाराने गुन्ह्यानंतर शेतात लपल्यास नवे ॲडिशनल कलम त्याच्यावर ठोकण्यात यावे, अशी शिफारस मी करितो.
गुन्हेगाराने पोलिसांचा डोळा चुकवून गुन्हा केल्यास त्याला कडक शिक्षा होईल, असे बघावे. पोलिसांचा डोळा चुकवून केलेला गुन्हा हा अदखलपात्र मानू नये. पोलिसांना त्याचे ट्रेनिंग दिले जात नाही. कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगाराने गुन्हा केल्यानंतर पळून जाऊन दडून बसता कामा नये, अशी योजना करनेची गरज आहे.
साहेब, सध्या ठाणे येथे महाराष्ट्र पोलिस क्रीडास्पर्धा सुरु आहेत. सुमारे साडेतीन हजार पोलिस बांधव-भगिनी स्पर्धेत उतरल्या असून पदकांची लयलूट होनार आहे. महाराष्ट्र पोलिसांमध्ये वेगाने पळनारे कर्मचारीसुध्दा आहेत, याचा हा पुरावा आहे. म. पो. नी एकदा मनावर घेतले तर एकही गुन्हेगार सुसाट पळनार नाही. पळालाच तर शेतात जाऊन लपनार नाही.
तरी गुन्हेगारांना वचक बसावा, यासाठी नवी आचारसंव्हिता करावी, अशी विनंती नशापानी न करता केली असे. कळावे. आपला णम्र व आज्ञाधारक. बबन फुलपगार. बक्कल नं. १२१२.