वैदिक काळातील आयुर्वेद
esakal February 28, 2025 10:45 AM

डॉ. बालाजी तांबे

आयुर्वेदात विस्ताराने सांगितलेल्या अनेक संकल्पनांचा उल्लेख वेदांमध्ये केलेला आढळतो. ‘ऋतुचर्या’ म्हणजे प्रत्येक ऋतूत कसे वागावे, काय आहार घ्यावा, कोणते उपचार करावेत हे आयुर्वेदाच्या बहुतेक सगळ्या ग्रंथांमध्ये विस्तारपूर्वक दिलेले आढळते. अथर्ववेदात काळाचे वर्षचक्र याप्रमाणे समजावलेले आहे,

द्वादश प्रधयश्र्चक्रमेकं त्रीणि नभ्यदिकं उतच्चिकेत ।

तत्राहतस्त्रीणि शतानि शङ्कवः षष्टिश्र्च खीला अविचाचला ये॥

...अथर्ववेद १०-८

कालरूपी वर्षचक्राचे १२ महिने परिधीरूप (चक्राच्या बाह्यसीमा) आहेत. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे तीन नाभीरूप (चक्राचे आस) आहेत आणि तीनशे साठ अहोरात्र या चक्राला असणारे खिळे आहेत, ज्यामुळे हे चक्र स्थिर राहते, मजबूत राहते आणि ढिले होत नाही. अशा प्रकारे अथर्ववेदात वर्षाची तुलना चक्राशी केलेला आहे, तर शतपथब्राह्मणात वर्षाची तुलना मनुष्याशी केलेली आहे,

पुरुषो वै संवत्सरः ।...शतपथब्राह्मण १२-३

वर्षाचे १२ महिने असतात तसे शरीरात पाच महाभूतांचे पाच अग्नी व सात धातू हे मनुष्याच्या बाह्यसीमा असतात. वर्षात जसे तीन ऋतू असतात तसे शरीरात वातपित्तकफ हे तीन दोष असतात आणि वर्षात जसे ३६० दिवस असतात तशी शरीरात ३६० हाडे असतात. वेदकाळात हाडे मोजण्याची पद्धत वेगळी असल्याने ३६० ही संख्या आलेली आहे. उदा. आधुनिक वैद्यकात संपूर्ण बरगडी हे एक हाड मोजले जाते, मात्र वेदकाळात किंवा आयुर्वेदात एक बरगडी तीन हाडांच्या संयोगातून तयार झालेली आहे असे समजले जाते. नाक-कान किंवा शरीरात इतरत्रही सहज वाकवता येणाऱ्या शरीरभागाला आधुनिक वैद्यकात कार्टिलेज म्हटले जाते, मात्र भारतीय वैद्यकात त्यांना अस्थीत मोजले जाते. थोडक्यात मोजण्याची पद्धत निरनिराळी असल्याने हाडांच्या संख्येत फरक झालेला दिसतो. भारतवर्षाला वेद, श्रुती, संहिता, ब्राह्मणग्रंथ, आरण्यक, स्मृती, दर्शन, उपनिषद, नीती अशा वैदिक साहित्याचा समृद्ध वारसा आहे. या सर्वांतच आयुर्वेदाची मुळे सापडतात. काही ब्राह्मणग्रंथात आयुर्वेदाचे सापडणारे उल्लेख याप्रमाणे,

ऐतरेय ब्राह्मणात अश्र्विनीकुमारांचा ‘देवदेवतांचे वैद्य’ असा उल्लेख आहे. डोळ्यांचे विकार अंजनाने बरे होतात, निरनिराळ्या औषधांमुळे रोग बरे होतात, विशिष्ट वातावरणात साथीचे रोग पसरू शकतात, यासारखे उल्लेख सापडतात.

श्रुतींमधल्या श्रौतसूत्रांमध्ये अग्निहोत्र, दर्शपौर्णमासयज्ञ म्हणजे अमावस्येला आणि पौर्णिमेला करायचे यज्ञ, चातुर्मासात करायचे यज्ञ यांचे वर्णन आहे.

सूर्योदय आणि सूर्यास्त होत असताना झोपणे हे रोगाचे कारण असते असे अश्र्वलायन गृह्यसूत्रात सांगितलेले आहे.

गाईना रोग झाले असले तर त्यांना ज्या ठिकाणी यज्ञ होत आहेत अशा प्रदेशात चरण्यासाठी न्यावे असे खादिर गृह्यसूत्रात सांगितले आहे.

कौशिक सूत्रांमध्ये रोगशांतीसाठी विशेष मंत्र दिलेले आहेत. कफरोगामध्ये मधाचे पान, वात-पित्तरोगात तेलाचे पान, कंपवात, अस्थिभंग वगैरे रोगांमध्ये तुपाचे पान, तुपाचे नस्य यासारखे उपाय सुचविले आहेत, जे आयुर्वेदाशी अगदी मिळते-जुळते आहेत.

उपनिषद हे वैदिक साहित्यातील शेवटचे असल्याने त्यांना वेदांत असेही म्हटले जाते. सुमारे २०० उपनिषदे असली तरी त्यातील ११ उपनिषदे मुख्य समजली जातात. सर्व प्राचीन भारतीय शास्त्रांचा उदय व विकार उपनिषदांमधूनच झालेला आढळतो. तैत्तिरीय उपनिषदात अन्नाची दिलेली माहिती आयुर्वेदाशी तंतोतंत जुळणारी आहे.

‘अन्नं न निन्द्यात् तत् व्रतम् । अन्नेन जातानि जीवन्ति’ अन्नाची कधीही निंदा करू नये, जन्माला आलेले जीव अन्नामुळे जगतात असे उपनिषदात म्हटले आहे, तर ‘सर्वमन्ने प्रतिष्ठितम्’ म्हणजे सर्व जीवन अन्नामुळे प्रतिष्ठित होत असते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.

अन्नपचन हे जसे आयुर्वेदात समजावले तसे उपनिषदातही सांगितलेले आहे. आहाराचे अग्निद्वारा पचन झाले की त्यापासून सारभाग व मलभाग असे दोन भाग तयार होतात असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. सारभागातून संपूर्ण शरीराचे पोषण होते आणि मलभाग पुरीष, मूत्र, स्वेद यांच्या रूपाने शरीराबाहेर विसर्जित केले जातात. ऋग्वेदात तसेच छांदोग्यपनिषदात अन्नपचनाची प्रक्रिया उसाच्या रसापासून गूळ बनविण्याच्या प्रक्रियेचे उदाहरण देऊन समजावलेली आहे. गूळ बनविण्यासाठी तीन कढया वापरल्या जातात. उसाचा रस कढईत टाकून गरम केला जातो, तो गरम झाला की त्यातून बरीचशी मळी वेगळी होते. यातील मळीच्या व्यतिरिक्त चांगला गरम रस दुसऱ्या कढईत टाकला जातो. यातूनही उरलेली मळी वेगळी होते आणि उसाचा रस घट्ट होण्यास सुरुवात होते. हा घट्ट रस शेवटच्या कढईत आणून अजून शिजवला जातो व तो घट्ट झाला की त्यापासून गूळ, साखर किंवा राब बनवली जाते. याचप्रकारे अन्नाचा सुद्धा स्थूल, सूक्ष्म व अतिसूक्ष्म पाक होत असतो.

अन्नमशितं त्रेधा विधीयन्ते तस्य यः स्थविष्ठो धातुस्तत्पुरीषं भवति, यो मध्यमस्त्मांसं योऽणिष्ठस्तन्मनः । ...छांदोग्यपनिषद

सेवन केलेल्या अन्नाचा तीन प्रकारे पाक होतो, स्थूलपाकातून शरीरधातू तसेच पुरीष (मळभाग) तयार होतात, सूक्ष्म पाकातून मांस तयार होते आणि सूक्ष्मतम पाकातून मनाची पुष्टी होते.

आपः पीतस्त्रेधा विधीयन्ते तासां यः स्थविष्ठो धातुस्तन्मूत्रं भवति, यो मध्यमस्तल्लोहितं, योऽअल्पिष्ठः स प्राणः । ...छांदोग्यपनिद

सेवन केलेल्या द्रवाचा तीन प्रकारे पाक होतो, स्थूलपाकातून शरीरधातू तसेच मूत्र तयार होते, सूक्ष्म पाकातून रक्त तयार होते आणि सूक्ष्मतम पाकातून प्राणाची पुष्टी होते.

हृदय हा शब्द वेदकाळापासून प्रचलित आहे. या शब्दातच हृदयाचे कार्य स्पष्ट केलेले आहे. बृहदारण्यकातील पुढील सूत्रातून ही गोष्ट समजू शकते,

हृ इति एकमक्षरं अभिहरति अस्मै स्वाश्र्चान्ये च य एवं वेद ।

द इति एकमक्षरं ददाति अस्मै स्वाश्र्चान्ये च य एवं वेद ।

यं इति एकमक्षरमेति स्वर्गलोक य एवं वेद ।....बृहदारण्यक

‘हृ’चा अर्थ आहे आहरण करणे म्हणजे संपूर्ण शरीरातून रक्त घेणे; ‘द’ म्हणजे देणे म्हणजे संपूर्ण शरीराला रक्त देणे आणि ‘यं’ म्हणजे सर्व शरीरक्रियांचे नियमन करणे. अशा प्रकारे हृदय या शब्दातूनच त्याचे कार्य समजू शकते.

चरकसंहिता ही आयुर्वेदाची सर्वांत प्राचीन आणि महत्त्वाची संहिता मानली जाते. जे सतत प्रवास करतात, विचरण करतात अशा सर्व ऋषींसाठी बृहदारण्यक उपनिषदात ‘चरक’ शब्द वापरलेला आढळतो. चरकसंहितेचे मूळ लेखक अग्निवेश ऋषींचे गुरू आत्रेय ऋषी हे खरोखरच कधी हिमालयात, कधी कैलासावर, कधी कांपिल्य देशात तर कधी इंद्रलोकात असण्याचे संदर्भ सापडतात.

थोडक्यात आयुर्वेदशास्त्राची परंपरा अतिशय प्राचीन आहे. वेदाचा उपवेद म्हणून ओळख असणारे आयुर्वेदशास्त्र हजारो वर्षांपासून आरोग्य टिकविण्याचे आणि रोगमुक्तीचे काम करत आलेले आहे. हा प्राचीन वारसा आपण सर्वांनी मिळून जपण्यातच सर्वांचे हित आहे.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.