लक्ष द्या हृदयाकडे
esakal February 28, 2025 10:45 AM

डॉ. मालविका तांबे

गेल्या काही महिन्यांमध्ये सर्व वृत्तवाहिन्यांवर कमी वयात कुठलाही त्रास नसताना हृदयविकारांमुळे मृत्यू होण्याच्या अनेक बातम्या आलेल्या दिसतात. अगदी लहान मुलांपासून ते ४०-४५शीच्या लोकांमध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात आढळून आलेला दिसत आहे. बऱ्याच लोकांमध्ये आत्ताच सगळ्या तपासण्या केल्या होत्या, तेव्हा सगळे व्यवस्थित होते, एकाएकी असे सगळे झाले असे सांगितले जात आहे. खरे तर हृदयरोग बऱ्याच प्रकारचे असतात. साधारणपणे हृदयवाहिन्यांमध्ये असलेल्या अवरोधांबद्दल समाजामध्ये जास्त जागरूकता असलेला आढळते. पण अशा प्रकारे जेव्हा हृदयाची गती एकाएकी बंद होऊन व्यक्ती मृत होते तेव्हा त्यात वातदोषाशी निगडित बदल जास्त प्रमाणात जाणवतात. आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण आज हृदयरोगाची कारणे, सामान्य लक्षणे, प्रकार व त्यावर काय मदत करता येऊ शकते हे पाहू या.

अत्युष्णगुर्वन्नकषायतिक्त-श्रमाभिधाताध्यशनप्रसंगैः ।

संचिन्तनैः वेगविधारणैश्र्च

हृदामयः पञ्चविधः प्रदिष्टः ।।.....माधव निदान

व्यायामतीक्ष्णातिविरेकबस्ति-चिन्ताभयत्रासमदाभिचाराः ।

छर्द्यामसन्धारणकर्षणानि हृद्रोगकर्तृणितथाभिघातः ।।.....चरक चिकित्सा

हृदयरोगाचे निदान

अति उष्ण अर्थात फार जास्त प्रमाणात गरम वा तीक्ष्ण जेवण घेणे.

अति गुरू अर्थात जे अन्न आपल्याला पचत नाही अशा प्रकारचा आहार घेणे

अति आम्ल किंवा अति कषाय आहार घेणे,

फार जास्त प्रमाणात कडू पदार्थ खाणे.

फार जास्त श्रम करणे.

शारीरिक वा मानसिक स्तरावर आघात होणे.

आहाराच्या नियमांचे पालन न करणे.

आधी खाल्लेले अन्न पचले नसताना पुन्हा जेवणे किंवा आपल्या मर्यादेपेक्षा जास्त खाणे.

फार जास्त प्रमाणात मैथुन करणे.

फार जास्त विचार करणे.

वेगांचे धारण करणे.

व्यायाम अति प्रमाणात करणे.

वगैरे कारणे आयुर्वेदात सांगितलेली आहेत.

यातील सध्याच्या काळात दिसून येणारी दोन कारणे अशी.

अति व्यायाम : फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी अनेक जण स्वतःच्या शक्तीचा विचार न करता फार जास्त व्यायाम करतात व त्यामुळे त्यांच्या हृदयाची ताकद कमी होते व हृदयविकारांचा त्रास होतो. खूप जास्त सायकलिंग करणारे, तास न् तास जिममध्ये घालवणारे, मॅरेथॉन मध्ये भाग घेणारे, स्पोर्टमध्ये अति वेळ घालवणारे अशा व्यक्तींना फिट असतानाही कमी वयात कार्डियाक अरेस्ट आलेला दिसतो.

कर्षण अर्थात शरीरात डिजनरेशन होणे : हे हृदयरोगाचे दुसरे महत्त्वाचे कारण दिसते. सध्या डाएटच्या वेगवेगळ्या संकल्पना दिसतात. आपली झीरो फिगर असावी अशी अनेकांची इच्छा असते. आयुर्वेदाच्या मताने विचार केला तर वात, पित्त, कफ अशा तीन प्रकारच्या प्रकृती सांगितलेल्या आहेत. वाताची व्यक्ती बारीक, पित्ताची व्यक्ती मध्यम आकाराची व कफाची व्यक्ती साधारणपणे भारदस्त असते. सध्या मात्र प्रत्येकाने वात प्रकृतीचे व्हायचे ठरविले आहे. जरा कुठे शरीरावर थोडा मांसधातू किंवा मेदधातू दिसायला लागला तर तो कमी कसा करता येईल याचा प्रयत्न केला जातो. त्यातल्या त्यात जिमला जाणारे मांसधातू वाढावा असे प्रयत्न करतात पण त्याही प्रयत्नांची अनेकदा अति होते.

अशा प्रकारच्या कळत-नकळत होणाऱ्या चुकांमुळे शरीरात दोषांची विकृती उत्पन्न होते व हे दोष प्रकुपित अवस्थेत रसधातूला दूषित करून हृदयात जातात व हृदयरोग तयार होतात.

आयुर्वेदात हृदयरोगाची सांगितलेली लक्षणे अशी – श्र्वास लागणे, तोंडात विचित्र चव असणे, सारखी तहान लागणे, उलट्या होणे, छातीत दुखणे, अन्नावर रुची नसणे, चेहऱ्यावर तेजस्विता नसणे, मूर्च्छित होत आहे असे वाटणे, खोकला व उचक्या येणे, काही वेळा ताप असणे वगैरे.

आयुर्वेदानुसार हृदयरोग वात, पित्त, कफ, सान्निपातिक व कृमी अशा पाच प्रकारांमध्ये विभक्त केलेले असतात. हृदयरोग असण्याची शंका येते जेव्हा छातीत दुखायला लागते. दुखणे हे वातदोषाशी संलग्न असल्यामुळे तसेच हृदयातील रक्ताभिसरणाचे कार्य वातदोषाशी निगडित असल्यामुळे आपल्याला हृदयरोगांमध्ये वातदोषाची काळजी सगळ्यात आधी घ्यावी लागते.

सकाळी वेळेत उठणे व रात्री वेळेत झोपणे हे वातसंतुलनासाठी अत्यंत गरजेचे असते. मुख्यत्वे रात्री वेळेवर झोपणे हे हृदयाच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते.

जेवणाच्या वेळा नियमित असाव्या. रात्रीचे उशिरा जेवणे किंवा जड जेवणे हे दोन्ही अपचन, गॅसेस, आम्लपित्त यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अशा प्रकारचा त्रास झाल्यावर बऱ्याच लोकांना छातीवर वेगळ्या प्रकारचा दबाव जाणवतो, तो क्वचित कधी तरी फक्त अपचनामुळे असू शकतो, किंवा कधी तरी अपचनाचा हृदयावर होणाऱ्या चुकीच्या परिणामामुळे सुद्धा असू शकतो. या दोघांमधला फरक ओळखणे फार अवघड असते, त्यामुळे शक्यतो अशा प्रकारच्या अपचनापासून लांब राहिलेले बरे. अपचन टाळण्यासाठी दिवसातून एकदा तरी एक ग्लासभर गरम पाणी पिणे, जेवणाच्या आधी आल्या-लिंबाचा रस मधात मिसळून त्याचे चाटण घेणे, सकाळी अर्धा कप गरम पाणी थोडा आल्याचा रस व काळे मीठ घालून घेणे, संतुलन अन्नयोग किंवा संतुलन पित्तशांती गोळ्या पचनाकरता नियमित घेणे यांची मदत होऊ शकते.

रात्रीचे जेवण सातच्या आत करावे व जेवणात सुपाच्या गोष्टी असाव्या.

रात्री झोपण्यापूर्वी सॅन कूलसारखे चूर्ण घेतल्यास पोट साफ राहायला तसेच वात-पित्त संतुलित राहण्यास मदत मिळते.

रोज सकाळी अभ्यंग करावा. यामुळे शरीरात वातदोष संतुलित राखायला मदत मिळते, तसेच रक्ताभिसरण व्यवस्थित होऊन हृदयालासुद्धा फायदा होतो. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे नेहमी म्हणत असत की रोज रात्री झोपताना छातीला तेल लावणे हे हृदयाचे संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे ज्या घराण्यांमध्ये हृदयघाताचा इतिहास आहे त्यांनी कमी वयापासूनच रोज छातीला तेल लावून झोपण्याची सवय ठेवावी.

कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण हृदयासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे आपल्या दिनचर्येत कुठले तरी छंद जोपासणे, आपल्या मित्रपरिवाराबरोबर थोडा वेळ घालवणे, चांगली पुस्तके वाचणे, मन शांत ठेवण्याच्या दृष्टीने स्वास्थ्यसंगीत ऐकणे, ध्यान-धारणा करणे आवश्यक असते. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांची स्पिरीट ऑफ हार्मनी हे स्वास्थ्यसंगीत हदयासाठी व उच्च रक्तदाबासाठी मदतीचे ठरते असे संशोधनात आढळून आलेले आहे. बरोबरीने रोज ॐकार म्हणणे, संतुलन क्रियायोग करणे, नियमित चालायला जाणे हेही हृदयाच्या ताकदीसाठी महत्त्वाचे असते.

३५-४०शीला आल्यावर संतुलन आत्मप्राश किंवा सुहृदप्राश नियमित घेण्याचा फायदा होऊ शकतो. तसेच वैद्यांच्या सल्ल्याने अर्जुनारिष्ट, शृंग भस्म, कार्डिसॅन प्लस वगैरे वेगवेगळी औषधे घेण्याचा फायदा मिळू शकेल.

सध्या वेगवेगळ्या प्रकारची गॅजेट्स उपलब्ध आहेत. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी यांचा उपयोग करून तब्येतीचे मॉनिटरिंग करता येते.

घराण्यात हृदयरोगाचा इतिहास असल्यास संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेऊन हृद्बस्ती करून घेण्याचा, तसेच वातसंतुलनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या बस्ती करून घेण्याचा फायदा मिळू शकेल.

एकूणच हृदयासारख्या महत्त्वपूर्ण अवयवाची काळजी घेणे अधिक उत्तम असते. एकदा त्रास झाल्यावर कितीही प्रयत्न केला तरी हृदयाची कार्यक्षमता पूर्ववत होऊ शकत नाही हे लक्षात ठेवावे. आयुर्वेदाच्या मार्गदर्शनाखाली आहार दिनचर्या आणि उपचारांचे मार्गदर्शन घेतल्याने अशा प्रकारच्या त्रासांपासून लांब राहण्यात मदत मिळू शकेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.