सोलापूर : छावा या बहुचर्चित चित्रपटात सोलापूरचे दोन कलावंत आहेत. रोहन नंदाने व देवा चिंचोळीकर या दोघांनी मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. या दोन जिगरी मित्रांची चित्रपटामध्ये सेनापतीची भूमिका आहे. यापूर्वी त्यांनी अनेक मालिकांमधून काम केले आहे. आता छावा या बिगबजेट आणि प्रेरक चित्रपटातील त्यांची भूमिका सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. रोहन आणि देवाने यापूर्वी मालिका, चित्रपटांमध्ये पत्रकार, पोलिस अधिकारी, डॉक्टर, वॉर्ड बॉय, बॅंक ऑफिसर अशा अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
अखेरच्या श्वासापर्यंत मोगल सल्तनतीसमोर न झुकलेला योद्धा, शौर्यवंत छत्रपती संभाजीराजे यांच्या भोवती छावा चित्रपटाची कथा गुंफली आहे. दोन्ही कलावंतांनी सांगितले की, चित्रीकरणाचा बराचसा भाग भोर तालुक्यात करण्यात आला. तेथील एका मोठ्या वाड्यात यांची भूमिका असलेला शॉट घेण्यात आला. २१ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता सुरू झालेले चित्रीकरण दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता संपले. म्हणजेच तो सीन पूर्ण झाला, अशी मेहनत प्रत्येक कलाकाराने घेतलीय, असे अनुभव देखील त्यांनी सांगितले.
‘छावा’तील भूमिका माझ्यासाठी सुवर्णक्षण
आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे आई-वडिलांचे सहकार्य माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्यामुळेच आज मी अनेक चित्रपट मालिकांमध्ये अभिनय साकारत आलोय. तिथे मला अनेक गोष्टी अनुभवायला आणि शिकायला मिळाल्या. ‘छावा’ चित्रपटात माझी सेनापतीची भूमिका माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे. विशेष म्हणजे माझ्या वाढदिवसादिवशी चित्रपट प्रदर्शित झाला, यामुळे अधिक आनंदित आहे, असे रोहन व देवा या दोघांनी सांगितले.
सोलापूर शहरातील ६ चित्रपटगृहे हाऊसफुल्ल
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे पूत्र संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा असलेला छावा हा चित्रपट सोलापूर शहरातील जवळपास तीन लाख तर ग्रामीणमधील पाच लाखांहून जास्त जणांनी पाहिला आहे. सोलापूर शहरातील ६ चित्रपटगृहांसह विविध समाज माध्यमांमधूनही हा चित्रपट पाहिला जात असल्याने प्रेक्षक संख्या जास्तच असू शकते. चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानावर आधारित अॅक्शन ड्रामा असलेल्या या चित्रपटाने देशभरात लोकप्रियता मिळवली आहे. सोलापुरात पहिल्या दिवसापासून (१४ फेब्रुवारीपासून) चित्रपटगृहांबाहेर ‘हाउसफुल्ल’ अशी पाटी झळकत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी १९ फेब्रुवारीला एका दिवसात राज्यात ३० कोटींचा रुपयांचा गल्ला या चित्रपटाने कमावला आहे, शिवाय २०० कोटींचा आकडा ओलांडणारा २०२५ मधील पहिला आणि सर्वात वेगवान चित्रपटही ठरला आहे.
सोलापुरातील चित्रपटगृहाचे नाव व रोजचे खेळ
भागवत सिनेमा : ६ खेळ
भागवत उमा मंदिर : ३ खेळ
ई स्क्वेअर ओॲसिस : ९ खेळ
लक्ष्मीनारायण सिनेमा : ३ खेळ
आर. मल्टीप्लेक्स : ६ खेळ
श्रीनिवास सिनेमॅटिक सिनेमा : ३ खेळ