फुलवडे - घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिनस्त आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह कोरेगाव पार्क पुणे येथील सुजल प्रकाश गेडाम या विद्यार्थ्याची जागतिक क्यूएस रँकिंगमध्ये नावाजलेल्या तसेच जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या इंग्लंड येथील लिव्हरपूल विद्यापीठात एम एस्सी अर्थशास्त्र या अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याची माहिती सहायक प्रकल्प अधिकारी सोनुल कोतवाल यांनी दिली.
आदिवासी कुटुंबातील सुजल हा परदेशातील महाविद्यालयात प्रवेश मिळविणारा महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. तो ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कळमगाव तुकूम (जि. चंद्रपूर) या आदिवासी खेड्यातून पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पदवी कला अभ्यासक्रमासाठी प्रवेशित होता.
‘करियरच्या नवीन वाटा’ या वसतिगृहातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमातून त्याची उच्च शिक्षणाप्रती ध्येय निश्चिती झाली. ज्यामुळे त्याला क्युट (CUET) व एपीयू-नेट (APU-NET) या परीक्षांच्या माध्यमातून भारतातील नावाजलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशाकरिता प्रयत्न केला. ज्यामध्ये अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी बेंगलुरु येथे एमए डेव्हलपमेंट या अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला तसेच शिष्यवृत्तीही प्राप्त झाली.
परंतु वसतिगृहातील एका कार्यक्रमादरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांची परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व प्रवेशाबाबत माहिती मिळाल्याने सुजलने इंग्लंड येथील लिव्हरपूल विद्यापीठ, मँचेस्टर विद्यापीठ व स्कॉटलंडमधील एडिनबर्ग विद्यापीठ या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी अर्ज केले. त्यातून इंग्लंड येथील लिव्हरपूल विद्यापीठात निवड झाली.
सुजलचे वडील प्रकाश गेडाम यांनी अथक परिश्रमातून आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले. वसतिगृहातील सर्वांगीण विकासाकरिता घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळेच मला हे यश प्राप्त झाल्याचे सांगत सुजलने संतोष नंदुरकर, डॉ. अर्चना नंदुरकर व गृहपाल उदय महाजन यांचे आभार व्यक्त केले.
सुजलच्या या यशाबद्दल नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.