Metro : माण-हिंजवडी मेट्रोची चाचणी लवकरच; तीन कोच दाखल
esakal March 01, 2025 05:45 AM

पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नियंत्रणाखाली सुरू असलेल्या माण-हिंजवडी मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याची चाचणी लवकरच घेण्याचे नियोजन केले जात आहे. यासाठी मेट्रोचे तीन कोच दाखल झाले आहेत. उर्वरित एक कोच मार्चअखेर दाखल होणार आहे.

हिंजवडी (माण, मेगापोलीस) ते शिवाजीनगर हा पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांना जोडणारा हा मेट्रो प्रकल्पातील तिसरा मेट्रो मार्ग आहे. हा संपूर्ण मार्ग उन्नत असून, पुणे-बंगळुरू महामार्ग आणि मुळा नदीवरून जात आहे.

प्रामुख्याने बाणेर, सकाळनगर आणि सिव्हिल कोर्ट स्थानकांची कामे शिल्लक आहेत. यांसह विविध ठिकाणी जिने आणि अकरा स्थानकांचे महत्त्वाचे काम बाकी आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मेट्रोची ‘ट्रायल रन’ घेण्यात येणार आहे.

प्रकल्पाच्या कामातील दिरंगाईमुळे पीएमआरडीएने ठेकेदाराला दंडात्मक कारवाईचा इशारा देत काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. आता ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

मेट्रोचे उर्वरित काम लवकर पूर्ण करून ‘ट्रायल रन’ घेण्यात येणार आहे. मेट्रोच्या कोचची तपासणी सुरू आहे. सध्या प्रकल्पाचे ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. ट्रायल रननंतर मेट्रो सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.

- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.