Maharashtra Politics : शिंदे गटाची ताकद वाढली; पुण्यातील आमदाराने हाती घेतलं धनुष्यबाण
Saam TV March 01, 2025 05:45 AM

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरुच आहे. राज्यातील विविध भागातील राजकीय नेत्यांकडून शिंदे गटात प्रवेश सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक राजकीय नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज दापोलीत ठाकरे गटाच्या ६ नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. शरद सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाने शिंदेंची ताकद वाढली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शरद सोनवणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, नारायणगावचे सरपंच बाबु पाटे यांनी प्रवेश केला. देवराम लांडे यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. बाबु पाटे ठाकरे गटाचे नेते म्हणून जुन्नर तालुक्यात काम करत होते.

उपमुख्यमंत्री उपस्थितीत आमदार शरद सोनवणे, देवराम लांडे आणि बाबू पाटे यांच्या प्रवेशाने शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. शिवाजी आढळराव पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडल्यानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी शरद सोनवणेंच्या खांद्यावर असणार असल्याचं बोललं जात आहे.

आमदार सोनवणे काय म्हणाले?

म्हणाले, मी आजपर्यत खूप मुख्यमंत्री पाहिले, पण वर्षा बंगल्यात राहून वर्षा बंगला माझा नाही, तर हा बंगला जनतेचा म्हणणारा पहिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदे यांच्या सारखा दुसरा मुख्यमंत्री आजपर्यंत पाहिला नाही, असा दावाही सोनवणे यांनी केलाय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.