IIT Baba Abhay Singh: महाकुंभाच्या व्हायरल 'आयआयटी बाबा'वर हल्ला! लाईव्ह शोमध्ये घडला प्रकार
esakal March 01, 2025 03:45 PM

महाकुंभ 2025 दरम्यान लोकप्रिय झालेले 'आयआयटी बाबा' अभय सिंह यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, नोएडाच्या सेक्टर 126 मधील स्टुडिओमध्ये झालेल्या या घटनेबाबत त्यांनी पोलीस तक्रार दिली होती, नंतर त्यांनी तक्रार मागे घेतली.

अभय सिंह यांच्या म्हणण्यानुसार, भगवे वस्त्र परिधान केलेल्या काही जणांनी स्टुडिओमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याशी गैरवर्तन करत काठ्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर 'आयआयटी बाबा' यांनी सेक्टर 126 पोलीस चौकीसमोर आंदोलन छेडले. मात्र, पोलिसांनी त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.

पोलिसांनी काय सांगितले?

सेक्टर 126 चे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, 'आयआयटी बाबा' यांना समजावून सांगण्यात आले आणि त्यांनी औपचारिक तक्रार नोंदवण्यास नकार दिला.

दरम्यान, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये 'आयआयटी बाबा' चर्चेत भाग घेत असताना काही साधू स्टुडिओत प्रवेश करतात. चर्चेदरम्यान वाद वाढल्याने बाबा उठून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या संघर्षाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

कोण आहेत 'आयआयटी बाबा'?

सुरू झाल्यापासून अनेक प्रभावशाली व्यक्ती, मॉडेल्स आणि अभिनेते सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात मॉडेल-साध्वी हर्षा ऋचारिया, माळ विक्रेता मोनालिसा, 'आयआयटी बाबा' अभय सिंह आणि अभिनेत्री ममता कुलकर्णी यांचा समावेश आहे.

अभय सिंह यांनी आयआयटी बॉम्बेमधून एरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. मात्र, त्यांचा अध्यात्माकडे प्रवास हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय नव्हता, तर एक 'आत्मीय ओढ' होती.

अध्यात्माच्या वाटेवर 'आयआयटी बाबा'

आयआयटी पदवीधर असूनही त्यांनी विविध क्षेत्रांत काम केले. त्यांनी ॲप्लिकेशन आणि वेबसाइट डिझायनिंगमध्ये काम केले, तसेच ट्रॅव्हल फोटोग्राफी आणि भारतीय कला-क्राफ्ट्सच्या डॉक्युमेंटेशनवरही काम केले. त्यांनी जुने मंदिरे, चित्रशैली आणि इतिहासाचे दस्तऐवजीकरण केले. त्याशिवाय, ते मासिके आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही सक्रिय होते.

महाकुंभबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, "महाकुंभातील सुविधा अतिशय उत्तम आहेत. मला वाटते की, हा सोहळा केवळ अध्यात्मिक मर्यादेत राहू नये. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ आणि इस्रोचे संशोधक येथे यावे आणि अध्यात्म व विज्ञान यांच्यातील संबंध समजून घ्यावा." त्यांनी पुढे सांगितले की, “आज अनेकांना चिंता आणि तणावापासून मुक्ती हवी आहे. मात्र, त्यासाठी आपल्या मूळ तत्त्वांशी जोडलेले राहणे गरजेचे आहे.”

सोशल मीडियावर संताप

'आयआयटी बाबा' यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी स्टुडिओत घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काहींनी याला धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी यावर राजकीय रंग चढवला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.