आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. टीम इंडियाने बांग्लादेश आणि त्यानंतर पाकिस्तानवर विजय मिळवला. त्यानंतर टीम इंडिया आता या मोहिमेतील साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. हा सामना रविवारी 2 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड टीम इंडियाप्रमाणेच या स्पर्धेत अजिंक्य आहे. न्यूझीलंडनेही सलग 2 सामने जिंकत उपांत्य फेरीत ए ग्रुपमधून प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघात रविवारी रंगतदार लढत पाहायला मिळू शकते.
टीम इंडियाचं सेमी फायनलमधील स्थान सुनिश्चित असल्याने भारतीय चाहत्यांना चिंता नाही. मात्र टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्धची आकडेवारी पाहिली तर चाहत्यांची चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही. टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्धची आकडेवारीच तशी आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यं इतर संघांवर विजय मिळवला आहे. मात्र टीम इंडियाला आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडने हा एकमेव सामना जिंकला होता. त्यामुळे आता टीम इंडियाचा हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न असणार आहे. रोहितसेना रविवारी न्यूझीलंडवर मात करत मागील पराभवाची परतफेड करणार का? याकडे साऱ्या क्रिकेट वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.