बुलडाणा, ता. २ – राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे जिवंत उदाहरण म्हणजे गुन्हेगारांविरोधात न्याय मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यालाच पोलीस ठाण्यात ठिय्या द्यावा लागत आहे, असे खोचक मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. त्यांनी राज्याला पूर्णवेळ स्वतंत्र गृहमंत्री असण्याची गरज असल्याचे ठामपणे सांगितले.
बुलडाण्यातील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी सध्याच्या गृहमंत्र्यांवर तसेच गृहराज्यमंत्र्यांवर टीका करताना "गृह विभागाचा कारभार आता घाशीराम कोतवालसारखा चालतो आहे," असा गंभीर आरोप केला.
मुक्ताईनगर आणि पुणे बलात्कार प्रकरणावरून सरकारवर टीकासपकाळ यांनी पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण तसेच मुक्ताईनगर येथील घटनेवरून सरकारला धारेवर धरले. "या घटनांनंतर तोंड उघडणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी गृहराज्यमंत्र्यांवरही टीका करताना "त्यांची वक्तव्ये बेताल असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे," असे स्पष्ट केले.
"बीडप्रमाणे बुलडाण्यातही आका प्रशासन?"सपकाळ यांनी बीडमध्ये प्रशासकीय व्यवस्थेतील गोंधळावर टीका करताना "बीड प्रमाणे बुलडाण्यातही आता आका प्रशासन चालते का?" असा प्रश्न विचारला.
त्यांनी जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील टक्कल पडण्याच्या घटनेबाबतही चिंता व्यक्त केली. ज्येष्ठ संशोधक डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी संशोधनाद्वारे ठराविक प्लॉटमध्ये आलेल्या गव्हामुळेच हा व्हायरस निर्माण झाल्याचे सिद्ध केले आहे. मात्र, स्थानिक प्रशासन आणि केंद्रीय मंत्री हे मान्य करायला तयार नव्हते.
"मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभर तोच गहू खावा"सपकाळ यांनी "जर बावस्कर यांचे संशोधन चुकीचे असेल, तर मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभर तोच गहू खावा आणि बावस्कर प्रसिद्धीसाठी बोलतात हे सिद्ध करावे," असे आव्हान दिले. "जर हा गहू निष्कलंक असेल, तर त्याचा प्लॉट सील का केला गेला?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
वाळू माफियांचा मुजोरपणासपकाळ यांनी बुलडाण्यातील वाढत्या वाळू माफियांवरही ताशेरे ओढले. त्यांनी सांगितले की, "अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो लावून त्यांचा अवमान केला जात आहे." प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.