देवळा- शेतशिवारात जायला रस्ता नसला तर किती गैरसोय होते याचे गांभीर्य जो या अडचणींचा सामना करतो तोच जाणतो आणि जेव्हा ही समस्या संपते आणि येण्याजाण्याचा रस्ता खुला होतो तो आनंद काही वेगळाच असतो.
देवळा तालुक्यातील चार मंडळांतर्गत अशी अडचणीचे २८ रस्ते नुकतेच खुले करण्यात आले असून त्यातील १९ रस्ते सहमतीने तर नऊ रस्ते आदेशाप्रमाणे खुले करण्यात आले. यामुळे कितीतरी नागरिक व शेतकऱ्यांची सोय झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.
देवळा तालुक्यात महसूल विभाग, न्यायालयामार्फत व परस्पर सहमतीतून मंडळनिहाय २८ रस्ते खुले करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. यात खर्डे येथील ७, लोहोणेर येथील १२, उमराणे येथील ४ तर देवळा येथील ५ याप्रमाणे एकूण २८ रस्ते वहिवाट आदेशानुसार तसेच लोकसहभागातून खुले करण्यात आले.
ग्रामस्थांचा पाठपुरावा आणि तहसील कार्यालयाचे सहकार्य यामुळे आता प्रवासाची वाट सुकर झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने हे रस्ते पूर्ण करण्यात आल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल ने-आण करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला. उर्वरित रस्ते प्रकरणी प्रलंबित दाव्यांचा तत्काळ निपटारा करून तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकानुसार रस्ते खुले करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
खर्डे मंडळ : खर्डे, हनुमंतपाडा, गुंजाळनगर (समझोत्याप्रमाणे) ,रामेश्वर, खर्डे (वा.)वाजगाव, गुंजाळनगर (वहिवाट आदेशानुसार)
लोहोणेर मंडळ : लोहोणेर, भऊर (२), विठेवाडी (२), खामखेडा, निंबोळा (२), फुलेनगर (२), खालप, वासोळ (सर्व समझोत्याप्रमाणे)
उमराणे मंडळ : उमराणे, सांगवी (वहिवाट आदेशानुसार) मेशीसह, तीसगाव (लोकसहभागातून)
देवळा मंडळ : पिंपळगाव, कापशी, भिलवाड (लोकसहभागातून) वाखारी, पिंपळगाव (वहिवाट आदेशानुसार)