‘आपण जिल्हा परिषद आणि कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढविणार आहोत. त्यामुळे तयारीला लागा. माणसे शोधा, पक्ष संघटन वाढवा’, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर : ‘लोकांची सेवा करा, त्यांना विश्वास द्या आणि आपला पक्ष संघटन वाढवा. जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’चे (NCP) गतवैभव निर्माण करण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये असून, तिचा आता वापर करा. घराघरांत जाऊन सभासद नोंदणी करा’, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी (Hasan Mushrif) कार्यकर्त्यांना केले.
सहाव्यांदा आमदार आणि नवव्यांदा मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या हस्ते मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मार्केट यार्डमधील राष्ट्रवादी भवनातील (NCP Bhavan) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील होते.
मुश्रीफ म्हणाले, ‘कागलमधील माझे विरोधक पहिल्या दिवसापासून माझा पराभव करून परिवर्तन करणार म्हणत होते. मात्र, सर्वसामान्य जनतेने चक्र फिरविले आणि मला सहाव्यांदा आमदार केले. त्यामुळे आजचा सत्कार-सन्मान या जनतेचा आणि माझ्यासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांचा आहे. लोकांची कामे, सेवा केल्यानेच मी नेता होऊन राजकारणात यशस्वी झालो. त्यामुळे लोकांची सेवा करा. आपण सर्व कार्यकर्ते निश्चितपणे ‘राष्ट्रवादी’ला सभासद नोंदणीत अव्वलस्थानी आणाल, याची मला खात्री आहे. राज्यात पाचशे महामंडळांची सदस्य संख्या ४८०० इतकी आहे. ४० स्थानिक समित्या आहेत. त्यामुळे जे जास्त सभासद नोंदणी करतील, त्यांची महामंडळ, समित्यांवर निवड केली जाईल.’
माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, ‘मंत्री मुश्रीफ यांच्या पाठबळामुळे मला आमदार होता आले. त्यांनी शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा कार्यातून जपला आहे.’ बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्वाधिक सभासद नोंदणी कोल्हापूरची करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. आदिल फरास आणि महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी पक्ष संघटनातून मंत्री मुश्रीफ यांचे हात बळकट केले जातील.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये ‘राष्ट्रवादी’ अव्वलस्थानी राहील, असे सांगितले. ‘जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मंत्री मुश्रीफ राहतील,’ असे ‘गोकुळ’चे संचालक किसन चौगले यांनी सांगितले. यावेळी मुश्रीफ यांच्या हस्ते सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. नूतन तालुकाध्यक्षांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. याप्रसंगी प्रवीणसिंह पाटील, युवराज पाटील, धैर्यशील पाटील, रेखा आवळे, बाळासाहेब देशमुख, सुधीर देसाई, जहिदा मुजावर, मधुकर जांभळे आदी उपस्थित होते. जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी स्वागत केले. नितीन दिंडे यांनी आभार मानले.
आता जिल्ह्याकडेही पाहावे‘पक्ष वाढीला आता चांगली संधी आहे. त्यामुळे कागल सोडून आता जिल्ह्याकडेदेखील आपण बघावे. महिन्यातून एक दिवस आम्हा कार्यकर्त्यांसाठी द्या. माजी आमदार राजेश पाटील यांना राज्यात मानाचे स्थान द्या’, अशी विनंती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मुश्रीफ यांना केली.
माणसे शोधा, तयारीला लागा‘आपण जिल्हा परिषद आणि कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढविणार आहोत. त्यामुळे तयारीला लागा. माणसे शोधा, पक्ष संघटन वाढवा’, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.