तेर (जि. धाराशिव) : शेतातील शेडचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करीत दोन बोकड व दोन शेळ्या चोरून नेताना डोक्यात दगड मारल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथे रविवारी (ता. तीन) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.
हिंगळजवाडी येथील विजय तानाजी मुळे यांच्या गावालगत असलेल्या गायरान शेतातील शेडचा पत्रा उचकटून चोरटे शेडमध्ये बांधलेले दोन बोकूड व दोन शेळ्या चोरून घेऊन जात होते. चोरट्यांनी शेडसमोर झोपलेले विजय मुळे यांचे वडील तानाजी भगवान मुळे (वय ६५) यांच्या डोक्यात दगड मारला.
यात गंभीर जखमी झाल्याने तानाजी मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विजय मुळे यांच्या फिर्यादीवरून संजय राजेंद्र पवार, जितू ऊर्फ जितेंद्र प्रभू पवार (दोघे रा. तेर), अमोल ईश्वर काळे, ईश्वर रामा काळे (दोघे रा. हिंगळजवाडी) या चार जणांविरुद्ध ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
या चौघांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तपास सहायक पोलिस निरीक्षक विलास हजारे करीत आहेत.