राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आज सकाळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवल्यानंतर त्यांनी तो स्वीकारत राज्यपालांना पाठवला होता.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड असून कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. त्यामुळे राजीनाम्याची मागणी वाढली होती. त्यानंतर तपास पूर्ण झाल्यानंतर गेल्या आठवड्यात सीआयडीने बीडच्या विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र सादर केलं. या आरोपपत्रात सीआयडीने हत्येच्या वेळी आरोपींनी काढलेले 15 व्हिडिओ आणि 8 फोटो देखील सादर केलेले आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर आज सकाळी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला. हा राजीनामा फडणवीस यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवला होता. तो आता राज्यपालांनी स्वीकारला असून धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून कार्यामुक्त केलं आहे.