भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. खरं तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून मनासारखा निर्णय घेतला होता. त्यात दुबईच्या खेळपट्टीवर 265 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. हे आव्हान या मैदानावर गाठणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. पण विराट कोहलीने एका बाजूने खिंड लढवली. त्याला मधल्या फळीत श्रेयस अय्यरची साथ मिळाली. त्यामुळे हा विजय सोपा झाला. श्रेयस बाद झाल्यानंतर अक्षर पटेलने विराट कोहलीसह मोर्चा सांभाळला. त्यामुळे विजय सोपा होत गेला. पण अक्षर पटेल आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर आता काय होईल अशी धाकधूक लागून होती. पण केएल राहुलने सावध आणि हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी करून टीम इंडियाला विजयाच्या वेशीवर आणलं. 6 धावांची गरज असताना हार्दिक पांड्या बाद झाला आणि रवींद्र जडेजा मैदानात आला. दोन धावा घेऊन 12 चेंडूत 4 धावा अशी स्थिती आली. स्ट्राईकला असलेल्या केएल राहुलने उत्तुंग षटकार मारला आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली आहे. इतकंच काय तर वनडे वर्ल्डकप अंतिम फेरीत पराभवाचा वचपाही काढला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा याने मन मोकळं केलं.
‘शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल सांगता येत नव्हतं. मधल्या टप्प्यात हा स्कोअर आरामात गाठू असं वाटतं होतं. पण या खेळपट्टीवर तुम्ही तुमचे शॉट्स खेळू शकत नाही हे देखील तितकंच खरं आहे. आम्ही शांतपणे धावांचा पाठलाग करत होता. आम्ही न्यूझीलंडपेक्षा ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगलं खेळलो. ऑस्ट्रेलियात अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध खेळताना सहा गोलंदाज हवे होते. तसेच शेवटपर्यंत फलंदाजी राहील असंही गणित होतं. या विजयाचं श्रेय सर्वांनाच जातं. विराट कोहलीने भारतासाठी बरीच वर्षे हे काम केलं आहे. आम्ही फलंदाजी शांतपणे करत होतो. शेवटच्या टप्प्यात हार्दिक पांड्याने मोठी फटकेबाजी करून प्रेशर हलकं केलं.’, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
‘जेव्हा तुम्ही अंतिम फेरीत पोहोचता तेव्हा तुम्हाला सर्व खेळाडू फॉर्मात हवे असतात. सर्वांनी आतापर्यंत झालेल्या सामन्यात प्रभाव टाकला आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही आता अंतिम फेरीबाबत जास्त काही विचार करत नाही. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे दोन्ही संघ तगडे आहेत. त्यामुळेच ते उपांत्य फेरीत आहेत. ही खूप दबावपूर्ण स्पर्धा आहे. आता थोडं रिलॅक्स होण्याची गरज आहे आणि त्यानंतर अंतिम फेरीबाबत रणनिती ठरवू.’ असंही रोहित शर्माने पुढे सांगितलं.