पर्यटनासह रोजगार देणारा व्याडेश्वर महोत्सव
esakal March 05, 2025 12:45 AM

पर्यटनासह रोजगार देणारा व्याडेश्वर महोत्सव
गुहागरात चार वर्षे आयोजन ; ३०० हून अधिक कलाकारांना व्यासपीठ
मयुरेश पाटणकर ः सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ४ ः गेली चार वर्ष गुहागरात होणारा व्याडेश्वर महोत्सव कलाकारांना, व्यावसायिकांना, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना प्रोत्साहन देणारा, रोजगाराची निर्मिती करणारा, पर्यटक व्यवसायाला मदत करणारा ठरत आहे. कोणत्याही स्वरूपातून उत्पन्नवाढीचे लक्ष्य न ठेवता परमेश्वराप्रमाणेच सढळहाताने सर्वव्यापी मदत करणारा असा हा महोत्सव गुहागरच्या प्रगतीची दिशा ठरवणारा ठरला आहे. या ठिकाणी तीन दिवसांत २६ संस्थांच्या ३००हून अधिक कलाकारांना व्यासपीठ मिळाले आहे.
गेली चार वर्ष व्याडेश्वर महोत्सव सुरू आहे. यंदा महोत्सवाची सुरवात नमन महोत्सवाने झाली. त्यात शेतकरी नृत्य, जाखडी नृत्य, मंगळागौर यांची भर पडली. पुढे मैदानीचा खेळाचा प्रकार असलेल्या पालखीनृत्याचेही सादरीकरण झाले. मल्लखांब, योगासनांचे सादरीकरणही आयोजित केले होते याशिवाय बेटी बचाओ, स्वच्छता सामाजिक विषयांवर आधारित नृत्याद्वारे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. तीन दिवसांत २६ संस्थांद्वारे ३००हून कलाकारांना महोत्सवातून व्यासपीठ मिळाले असून, त्यांना मानधनही दिले गेले, असे जयंत साटले यांनी सांगितले. तीन दिवसाच्या या महोत्सवात २२ खाद्यपदार्थांचे स्टॉल होते. यामधून व्यावसायिकांनाही लाभ मिळतो, असे स्टॉलधारक वैभव तांबे यांनी सांगितले. हे स्टॉल केवळ हॉटेल व्यावसायिकांसाठीच नाहीत तर हौशीखातर विविध प्रकारच्या पाककला करणाऱ्या गृहिणींनाही दिले जातात. हॉटेल व्यवस्थापन शिकणारे विद्यार्थीही स्टॉल लावतात. त्यातून त्यांना प्रत्यक्ष व्यवसायाचे शिक्षण मिळते. या महोत्सवात सायंकाळपासून विक्रीसाठी खाद्यपदार्थांची स्वतंत्र तयारी करावी लागते. या महोत्सवातून रोजगार निर्मिती होत आहे. आकाशपाळणा, नौका, विमान, झुकझूक गाडी, जम्पिंग सर्कल, मिकीमाऊसची घसरगुंडी, नेमबाजी, थ्रीडी रेस असे खेळ तिथे असतात. गुहागर तालुक्यात असे खेळ उपलब्ध असल्याने शनिवार, रविवारी तालुकावासीयही मुलांसोबत महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी येतात. या खेळांमधून १५ कुटुंबांना रोजगार मिळाला. येथे परजिल्ह्यातील पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे हा महोत्सव पर्यटनाला चालना देणारा ठरत आहे.
---
महोत्सवाचे हे आहे वैशिष्ट्य
चांगले आणि वेगळे काम करणाऱ्यांचा देवस्थानतर्फे सत्कार केला जातो. यंदा नासा, इस्रो संस्थेत काम केलेल्या विद्यार्थ्यांसह ४० एकर जागेत पक्षी अभयारण्य तयार करणारे नंदू तांबे, पद्मश्री मिळालेले दादा इदाते, निवृत्त ॲडमिरल हेमंत भागवत, कासव संवर्धन अभ्यासक शास्त्रज्ञ सुरेशकुमार यांचा सत्कार करण्यात आला.
---
कोट
आम्ही कराडवरून तीन ट्रक भरून साहित्य घेऊन २० जणांच्या टीमसोबत इथे येतो. तीन दिवस व्यवसाय करतो. आमच्याकडून देवस्थान भाडे घेत नाहीच; पण फुकट खेळांचा आनंद लुटण्याची विनंतीही ट्रस्टी करत नाहीत. व्याडेश्वरकृपेने भरपूर व्यवसाय होतो.
- दीपक चव्हाण, कराड, आकाशपाळणा व्यावसायिक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.