भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीपर्यंतचे सर्व सामने भारताने जिंकले आहेत. आता एक सामना जिंकताच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदावर टीम इंडिया तिसऱ्यांदा नाव कोरणार आहे. भारताने एकदा श्रीलंकेसोबत चॅम्पियन्स ट्रॉफी शेअर केली आहे. तर 2013 साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2017 साली जेतेपदाचं स्वप्न भंगलं होते. तेव्हा पाकिस्तानने 180 धावांनी भारताचा पराभव केला होताय या सर्वांचा हिशेब भारताने या स्पर्धेत चुकता केला आहे. आता भारताचा अंतिम फेरीचा सामना दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे. हा सामना 9 मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे. दरम्यान, उपांत्य फेरीत भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 4 गडी राखून पराभूत केलं. हा विजय वाटतो तितका सोपा नाही. कारण ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणणं काही सोपं काम नाही. पण भारताची रणनिती कामी आली. ट्रेव्हिस हेडला बाद करण्यात वरुण चक्रवर्तीला यश आलं. तर स्टीव्ह स्मिथ आणि एलेक्स कॅरेची विकेट मिळाल्याने धावांना ब्रेक बसला. त्याचबरोबर फलंदाजीत विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने डाव सावरला. या विजयाचं श्रेय कोणाला देणार यावर रोहित शर्माने स्पष्ट काय ते सांगून टाकलं.
‘या विजयाचं श्रेय सर्वांनाच जातं. आम्ही संघ म्हणून ही कामगिरी केली आहे. त्याने (विराट कोहलीने) भारतासाठी बरीच वर्षे हे काम केलं आहे. आम्ही फलंदाजी शांतपणे आपलं काम करत होतो. शेवटच्या टप्प्यात हार्दिक पांड्याने मोठी फटकेबाजी करून प्रेशर हलकं केलं.जेव्हा तुम्ही अंतिम फेरीत पोहोचता तेव्हा तुम्हाला सर्व खेळाडू फॉर्मात हवे असतात. सर्वांनी आतापर्यंत झालेल्या सामन्यात प्रभाव टाकला आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही आता अंतिम फेरीबाबत जास्त काही विचार करत नाही. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे दोन्ही संघ तगडे आहेत.’, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
भारताचा अंतिम फेरीचा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे. या दोन्ही संघात उपांत्य फेरीचा सामना 5 मार्चला होणार आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये हे दोन्ही संघ भिडणार आहेत. विजयानंतर एक संघ दुबईला अंतिम फेरीचा सामना खेळण्यासाठी येणार आहे. भारताने न्यूझीलंडला साखळी फेरीत पराभूत केलं आहे. तर आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं आहे. त्यामुळे अंतिम फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.